विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: June 12, 2016 00:51 IST2016-06-12T00:51:15+5:302016-06-12T00:51:15+5:30

दोघेही शेतकरी: आखाडेत शोककळा; केबल काढताना दुर्घटना

Death of both by electric shocks | विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

मेढा/कुडाळ : शेतात नांगरताना आडवी येणारी टीव्ही केबलची वायर बाजूला करत असताना विजेचा धक्का बसल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना जावळी तालुक्यातील आखाडे येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. भास्कर शिवराम गुंजाळे, शरद दिनकर शिंदे अशी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आखाडे येथील शरद शिंदे (वय ५५) आणि भास्कर गुंजाळे (६२) हे शनिवारी सकाळी सात वाजता मणीची पट्टी शिवारात मशागतीसाठी औत घेऊन गेले होते. नांगरत असताना त्यांना शेतात केबल पडलेली आढळली. ही केबल आडवी येत असल्याने शरद शिंदे हाताने ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. शिंदे यांना केबलपासून बाजूला करत असतानाच भास्कर गुंजाळे यांनाही विजेचा धक्का बसला. या धक्क्याने भास्कर गुंजाळे आणि शरद शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
या शेतानजीक असलेल्या किसन आंबुले यांच्या विहिरीवर मोटार बसविण्यात आली असून, त्याची विद्युत जोडणी या शेतातून नेली आहे. या शेतातूनच टीव्ही केबलही गेली आहे. दोन्ही वायरी एकमेकांना जोडलेल्या आढळल्या. शेतीपंपाची वायर आणि केबलला एकमेकांना आधार म्हणून त्या गुंफल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी केबलही तोडलेली आढळली. टीव्ही केबलला विजेचा धक्का बसणार नाही, असे गृहीत धरून शिंदे यांनी ही वायर हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे धक्का बसून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ताबडतोब विद्युत पुरवठा खंडित करून दोघांना केबलपासून बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रणजित देसाई, महावितरणचे सहायक अभियंता थोरवडे, कुडाळ उपविभागाचे कनिष्ठ अभियंता यादव यांनी तातडीने भेट दिली. शरद गुंजाळे यांचे भाऊ विलास हे वीज कर्मचारी आहेत.
ही दोस्ती तुटायची न्हाय...
शरद शिंदे आणि भास्कर गुंजाळे हे दोघेही चांगले मित्र होते. त्यांचा जमिनीत वारंगुळा होता. एकमेकांच्या शेतातील सर्व कामे ते दोघे एकत्र करीत होते... अन् शनिवारच्या दुर्घटनेत दोघांचाही एकदमच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of both by electric shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.