आश्रमशाळेतील मुलाचा कालव्यात मृतदेह
By Admin | Updated: January 11, 2016 00:50 IST2016-01-10T22:45:49+5:302016-01-11T00:50:07+5:30
लोणंद परिसरात खळबळ : घातपात की अपघात याविषयी बळावला संशय

आश्रमशाळेतील मुलाचा कालव्यात मृतदेह
लोणंद : पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह सायंकाळी उशिरा नीरा उजव्या कालव्यात आढळला. सकाळपासून तो बेपत्ता होता.
सूरज संजय सोनझारिका (वय १२, रा. नवी आळी, भोर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पुणे येथील मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या पाडेगाव येथील समता आश्रमशाळेत २०१५ पासून तो शिकत होता. शुक्रवार दि. ८ रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने त्याला पळवून नेल्याची फिर्याद आश्रमशाळेचे अधीक्षक कुंडलिक साठे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली होती.
सूरजच्या आई-वडिलांना कळविल्यावर त्यांनीही आश्रमशाळेत येऊन सूरजबाबत माहिती घेतली व नातेवाइकांकडे शोध घेतला; मात्र तो कोठेच सापडला नाही. शोध सुरू असताना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सूरजचा मृतदेह नेवसे वस्तीनजीक नीरा उजव्या कालव्यात सापडला. याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसमवेत तेथे धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नीरा उजव्या कालव्यामधून सूरजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सूरजचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसेच हा घातपात की अपघात यादृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)