‘डीसीसी’त माणचा आकडा ‘तीन’!
By Admin | Updated: April 17, 2015 00:09 IST2015-04-16T22:02:23+5:302015-04-17T00:09:13+5:30
इच्छुकांची मोर्चेबांधणी : इतिहासात प्रथमच अधिक संचालक निवडूण येणार--सांगा डीसीसी कोणाची ?

‘डीसीसी’त माणचा आकडा ‘तीन’!
नितीन काळेल- सातारा -जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी शेकडो जण इच्छुक असले तरी जिल्ह्यातील २१ जणांनाच संधी मिळणार आहे. या २१ जणांत माण तालुक्यातील किमान तिघेजण तरी असणार, असे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे बँकेच्या इतिहासात प्रथमच माणला अधिक संचालक मिळू शकतात. यामध्ये आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, मनोजकुमार पोळ, संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, अॅड. भास्करराव गुंडगे यापैकी तिघेजण असण्याची शक्यता अधिक आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दि. ५ मे रोजी होत आहे. २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत आणखी काही दिवस असताना अनेकांनी जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे. सत्ताधारी पॅनेलमधील अनेकांनी वरिष्ठापर्यंत धाव घेऊन जिल्हा बँकेत येण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. असे असताना माण तालुक्यातूनही अनेकजण इच्छुक म्हणून पुढे आलेले आहेत. माणमधून सोसायटी मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार व विद्यमान संचालक सदाशिवराव पोळ, पोळ यांचा मुलगा मनोजकुमार पोळ, रामचंद्र माने, युवराज बनगर, संजय जगताप. इतर मागास प्रवर्गातून पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग आणि नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघ (दोन्ही मतदारसंघातून) अॅड. भास्करराव गुंडगे, भटक्या विमुक्त प्रवर्गातून अर्जुन काळे यांचाही अर्ज आहे. औद्योगिक विणकर व मजूर मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान संचालक अनिल देसाई यांचा अर्ज आहे.
सोसायटी मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे व विद्यमान संचालक सदाशिवराव पोळ यांच्यात लढत होणार आहे. ऐनवेळी पोळ स्वत:चा अर्ज मागे घेऊन मुलगा मनोजकुमार पोळ यांनाही पुढे आणू शकतात. त्यामुळे आमदार गोरे व पोळ पिता-पुत्रांपैकी कोणीतरी निवडणूक रिंगणात असणार आहे. इतर मागास प्रवर्गातून जिल्ह्यातील अनेकजण इच्छुक असले तरी बँकेतील सत्ताधारी गटाकडून शेखर गोरे यांचाच पर्याय समोर असणार आहे. कारण आमदार गोरेंना थोपवायचे असेल तर शेखर गोरेंसारखा हुकमी एक्का नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना किंवा राष्ट्रवादीला शेखर गोरे यांना थांबविणे परवडणारे नाही. औद्योगिक विणकरमधून अनिल देसाई यांनी यापूर्वी दोनदा बाजी मारली आहे. ते सत्ताधारी गटातील आहेत. यंदाही ते सत्ताधारी गटाकडून रिंगणात असणार हे स्पष्ट आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून अॅड. भास्करराव गुंडगे व अर्जुन काळे उतरले आहेत. दोघांनाही संधी मिळण्याचे प्रमाण कमी आहे. बँकेसाठी दुसरे पॅनेल तयार झाले तर काळे रिंगणात असण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाचवेळी माणमधील दोघांना संचालक होण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये सदाशिवराव पोळ आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. त्यामध्ये यंदा आणखी एका संचालकाची भर पडण्याची अधिक शक्यता आहे.
शेखर गोरेंना डावलणे शक्य नाही...
माणमध्ये सोसायटी निवडणुका व ठरावांच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखर गोरे एकत्र होते. त्यामुळे अनेक सोसायटी या दोघांकडे आल्या आहेत. सदाशिवराव पोळ व शेखर गोरे यांनी निवडणुकीत उतरणार, हे पहिल्यापासून सांगितलेच आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात कोण असणार, असा प्रश्न पडला होता; पण तो आता संपुष्टात आला आहे. पोळ हे सोसायटी तर शेखर गोरे इतर मागास प्रवर्गातून आहेत. शेखर गोरे यांच्याकडे अनेक सोसायट्या आहेत. त्यांची मदत ही पोळ यांना घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातून शेखर गोरेंना सहजासहजी डावलणे शक्य नाही.
तात्या की मुलगा...
माणमधून सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे यांच्याबरोबरच सदाशिवराव पोळ, मनोजकुमार पोळ, युवराज बनगर, संजय जगताप आदींचे अर्ज आहेत. शेवटी आमदार गोरे हे निवडणुकीत असणार, हे स्पष्ट आहे. विरोधात माजी आमदार पोळ असू शकतात; पण सध्या पोळ तात्या मुलगा मनोजकुमार पोळ यांना निवडणुकीत उतरवू पाहत आहेत. त्यामुळे सोसायटी मतदारसंघात आमदार गोरे यांची लढत ही पोळ पिता-पुत्रांपैकी एकाशीच होऊ शकते.