जागतिक वारसास्थळ कासवर फुलांची पहाट! अंमलबजावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:16+5:302021-08-25T04:44:16+5:30

सागर चव्हाण/पेट्री जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी तुरळक फुलांचा हंगाम सुरू झाल्याने बुधवारपासून पर्यटन शुल्क आकारणीस सुरुवात होणार आहे. ...

Dawn of flowers on the World Heritage Site Kas! Execution! | जागतिक वारसास्थळ कासवर फुलांची पहाट! अंमलबजावणी!

जागतिक वारसास्थळ कासवर फुलांची पहाट! अंमलबजावणी!

सागर चव्हाण/पेट्री

जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी तुरळक फुलांचा हंगाम सुरू झाल्याने बुधवारपासून पर्यटन शुल्क आकारणीस सुरुवात होणार आहे. पर्यटकांनाही कासच्या फुलोत्सवाचे वेध लागले आहेत. सध्या ऑफलाईन, त्यानंतर एक सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंगला सुरुवात होणार आहे.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने बुधवार, २५ ऑगस्टपासून हंगामाची अधिकृत सुरुवात होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

पठारावर सद्यस्थितीत गेंद, कीटकभक्षी, आमरी, जांभळा तेरडा, सोनकी, टूथब्रश, वायतुरा, रानहळद, नीलिमा, मंजिरी, दीपकांडी, रोटाला, पंद, अभाळीनभाळी, भुईकारवी आदी फुलांच्या जाती तुरळक दिसत असून पठार काहीच दिवसात पूर्णपणे अच्छादित होणार आहे. बहुतांशी फुलांच्या जाती फुलण्याच्या मार्गावर आहेत.

चवर, कुमुदिनी फुलांना चांगला बहर आला असून तुरळक पांढऱ्या रंगाची छटा दिसत आहे. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी, दाट धुके, पठारावरून कोसळणारा छोटा धबधबा यामुळे पर्यटकांना कुटुंबासमवेत पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय घाटाई फाटा, कास तलावाच्या वरील बाजूस (पठाराच्या दोन्ही बाजूस) करण्यात आली आहे. सध्या तुरळक फुले दिसत असून ज्या पर्यटकांना गेटमधून आत जाऊन फुले पाहायची आहेत, त्यांना पर्यटन शुल्क द्यावे लागणार आहे.

कोट

कास पठार कार्यकारी समिती, वन विभागाच्यावतीने कासच्या हंगामाची जय्यत तयारी केली असून पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हुल्लडबाजी करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचीही मदत घेणार आहे. पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होण्यास उन्हाची ताप पडत असून पोषक वातावरण होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.

- मारुती चिकणे

अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

चौकट

कास पठारावर साधारण फुलांचे २८० हेक्टर क्षेत्र असून पाच हेक्टर परिसरापर्यंत पर्यटक फुले पाहण्यासाठी फिरू शकतात. बाकी सर्व क्षेत्रातील फुलांचे दर्शन कुंपणातून घेता येते. पठार परिसरात गवताच्या जाती धरून विविधरंगी दुर्मिळ फुलांच्या जाती ४३० च्या आसपास असून साधारण १३२ च्या आसपास पठारावर फुलांच्या जाती पाहावयास मिळतात. मागील वर्षी कासपुष्प पठार बंद होते. २०१९ मध्ये एक लाखाहून अधिक पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली होती.

चौकट

कास पठार परिसर दर्शन बस सेवेमध्ये घाटाई देवराई, कास तलाव, कास बंगला, भारतातला सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा, अंधारी येथून कोयनेचा शिवसागर जलाशय, सह्याद्रीनगर येथील पवनचक्क्या, एकीवचा धबधबा, नवरा-नवरीचा डोंगर पाहण्यासाठीचे नियोजन होत असल्याची माहिती उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली.

Web Title: Dawn of flowers on the World Heritage Site Kas! Execution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.