कन्यादानापूर्वीच पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू !

By Admin | Updated: April 10, 2016 00:10 IST2016-04-09T23:52:32+5:302016-04-10T00:10:47+5:30

दोन्ही नियोजित वधू जखमी

Before the daughter-in-law, the father died of a jeep! | कन्यादानापूर्वीच पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू !

कन्यादानापूर्वीच पित्याचा जीपच्या धडकेत मृत्यू !

वाठार स्टेशन : विवाहासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून दुचाकीवरून ट्रीपलसीट घरी परतत असताना झालेल्या अपघातात वधूपिता जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या दोन्ही नियोजित वधू जखमी झाल्या. दिलीप धोंडिराम भोईटे (वय ५९, रा. वाघोली, ता. कोरेगाव) असे मृत पित्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप भोईटे यांच्या दोन मुलींचा विवाह येत्या २९ एप्रिलला एकाच मंडपात होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. लग्नासाठी लागणारे कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी भोईटे शुक्रवारी त्यांच्या दोन्ही मुली शुभांगी आणि रेश्मा यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच ११ डी ३६०५) साताऱ्याला गेले होते. खरेदी केल्यानंतर ते ट्रीपलसीट वाघोलीकडे यायला निघाले.
पाटखळ माथ्यानजीक असलेल्या एका हॉटेलसमोर ते आले असता ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव जीपने (एमएच १२ पीए २२९०) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दिलीप भोईटे दूरवर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून जीपचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले.
भोईटे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतात काबाडकष्ट करून त्यांनी दोन मुली व दोन मुले यांचे शिक्षण पूर्ण केले. दोन्ही मुलींचे एकाच मंडपात लग्न होणार असल्याने घरातील वातावरण आनंदी होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने या कुटुंबाचा आधारच हरपला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भोईटे यांचा मृतदेह शनिवारी सकाळी सात वाजता घरी आणल्यानंतर पत्नी व मुलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थ व नातेवाइकांच्या उपस्थितीत सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. (वार्ताहर)
त्या दोघी मुली जखमी; वडिलांच्या मृत्यूबाबत अनभिज्ञ !
अपघातात शुभांगी आणि रेश्मा या दोघींचाही पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांना अद्याप सांगण्यात आले नाही. नातेवाईक त्यांच्या चौकशीसाठी जवळ आल्यानंतर ‘बाबा कसे आहेत?,’ अशी विचारपूस त्या दोघी करत आहेत.

Web Title: Before the daughter-in-law, the father died of a jeep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.