दत्ताविरुद्ध तक्रार दिली म्हणून तिघांचे अपहरण
By Admin | Updated: November 13, 2014 23:42 IST2014-11-13T23:36:45+5:302014-11-13T23:42:15+5:30
गोवे येथील घटना : दोन दिवस थांगपत्ता नाही

दत्ताविरुद्ध तक्रार दिली म्हणून तिघांचे अपहरण
सातारा : प्रतापसिंहनगरातील दत्ता जाधवच्या विरोधात तक्रार दिल्याच्या आरोपावरून अज्ञात दोघांनी गोवे (ता. सातारा) येथील तिघांचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांना अपहृतांचा ठावठिकाणा न लागल्याने त्या तिघांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
वसंत बळवंत निकम (वय ४५, रा. गोवे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि. ११ रोजी सकाळी दहा वाजता दोन मोटारसायकलवरून दोन युवक आमच्या घरात आले. संतोष बळवंत निकम, संतोष लोहार, सागर पाटेकर (सर्व रा. गोवे) या तिघांना मोटारसायकलवर बसवून त्यांनी पळवून नेले. सागर ज्ञानदेव पाटेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दत्ता जाधवच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या कारणावरूनच संबंधितांनी या तिघांचे अपहरण केले आहे. तसेच अज्ञात ठिकाणी त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. नेमका काय प्रकार आहे, हे सांगण्यासही पोलीस नकार देत आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी अपहृत तिघांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. त्या तिघांना नेमके कोठे डांबून ठेवले आहे, हेही अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. (प्रतिनिधी)