धाडी जोरात...तरीही मटका सुरूच !

By Admin | Updated: July 15, 2016 22:37 IST2016-07-15T22:18:47+5:302016-07-15T22:37:46+5:30

एकाच आठवड्यात १६ छापे : ‘एसपीं’च्या आदेशानंतर पोलिस हालले

Dash loud ... still sticking! | धाडी जोरात...तरीही मटका सुरूच !

धाडी जोरात...तरीही मटका सुरूच !

सातारा : शांत आणि संयम सातारा आता जुगाऱ्यांच्या विळख्यात अडकत चालला असून, साताऱ्याच्या सांस्कृतिक दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यात जुगार, मटक्याचे अड्डे बिनबोभाट सुरू आहेत. मात्र नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैद्य व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी शहरात छापेमारी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी एकाच आठवड्यात १६ ठिकाणी कारवाई करून तीसजणांना अटकही केली.
सातारा शहर हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात कसलाही दंगा होत नसल्याचे खुद्द पोलिसच मानतात; मात्र शहरात अनेक ठिकाणी अवैद्य व्यवसायाने अक्षरश: विळखा घातला असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून दिसून येत आहे. शहराच्या प्रत्येक गल्ली आणि पेठामध्ये कुठे ना कुठे तरी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरूच आहेत. काही नागरिकांनी म्हणे एसपींना थेट याची माहिती दिली.
त्यानंतर एसपींनी पोलिसांना कानपिचक्या दिल्यानंतर अचानक शहरात धाडसत्र सुरू झालं. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १६ ठिकाणी मटका व जुगार सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले. याचा अर्थ पोलिसांना शहरात मटका सुरू असल्याचा कसलाही सुगावा नव्हता, असा होत नाही. शहरातील कोणत्या गल्लीबोळात काय घडतं, हे पोलिसांना समजत असतं. असे असताना मटका सुरू झाल्याचा पोलिसांना सुगावा कसा काय लागत नाही, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.


म्हणे हे सुरूच राहणार !
कोणताही अधिकारी नवीन आल्यानंतर अशा प्रकारच्या कारवाया होतच असतात. त्यामुळे पोलिसांना यात फारसे काही नावीन्य वाटत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही ‘कडक’ आदेश दिले तरी अशा प्रकारचे व्यवसाय लपून-छपून का होईना सुरूच राहतात. त्याला कोणीही काही करू शकत नाही, असे पोलिस खासगीत बोलून दाखवितात.
प्रसन्नांच्या काळात भाव वधारला !
पोलिस अधीक्षक के.एम. एम. प्रसन्ना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वडापपासून सर्वच अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा दरारा निर्माण झाला होता. प्रसन्नांची भीती घालून पोलिस अशा व्यावसायिकांना गळ घालत होते. ‘साहेबांना समजले तर आमची काही खैर नाही,’ असे ते अवैद्य व्यावसायिकांना सांगत असत. त्यामुळे साहेबांच्या भीतीमुळे पोलिसांचा भावही वधारत होता. ‘तेरी भी छूप मेरी भी चूप,’ अशी स्थिती प्रसन्नांच्या काळात होती.

Web Title: Dash loud ... still sticking!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.