घाटावर काढलाय दसरा धुवायला...!
By Admin | Updated: October 8, 2015 22:24 IST2015-10-08T22:24:15+5:302015-10-08T22:24:15+5:30
घटस्थापनेची लगबग : महिलांबरोबरच पुरुषांचाही स्वच्छतेसाठी हातभार--झूम लेन्स

घाटावर काढलाय दसरा धुवायला...!
साई सावंत- कोंडवे
‘आमचे हे... मला घरात कुठल्याच कामात मदत करत नाहीत,’ अशी तक्रार मैत्रिणी आणि पाहुण्यांमध्ये करणाऱ्या अनेक महिला आहेत. पुरुषांनाही घरात काम करणे काहीवेळा कमीपणाचे वाटते; पण स्त्री -पुरुष समानतेचे अनोखे रसायन संगम माहुली येथील घाटावर पाहायला मिळते. महिलांबरोबरच कपडे धुण्यासाठी पुरुषांची दिसणारी गडबड संदेश देते, घाटावर दसरा काढलाय धुवायला... याचा!
सातारा शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगम माहुलीचा घाट सध्या भलताच व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांत सकाळी आठ वाजल्यापासूनच इकडे मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वर्दळ वाढली आहे. पूर्वी जिथे गाड्या धुण्यासाठी रांगा असायच्या, तिथे आता चक्क चादरींचे वाळवण दिसू लागले आहे. घाटावरील ही गर्दी घटस्थापनेची चाहूल देणारी आहे.
शहरात अपार्टमेंट संस्कृतीमुळे न्हाणीघर आता बाथरूम झाले. पूर्वीच्या खरबडीत फरशी जाऊन आता गुळगुळीत टाईल्सचे साम्राज्य बाथरूमवर आहे. त्यामुळे वर्षभर राबलेली कपडे धुणे या बाथरूमध्ये केवळ अशक्य झाले आहे. कपड्यातील घाण निघण्यासाठी आवश्यक असणारा खडबडीत दगडही आता फारसा पाहायला मिळत नाही. त्यामुळे घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला अनेकांनी घरातील कपड्यांचे बोचके मिळेल, त्या वाहनात टाकून माहुलीचा घाट गाठला.
माहुलीच्या या घाटावर गावातील लोकांबरोबरच शहरातील नागरिकांचाही मोठा राबता अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. शहरातील अपुरा पाणीपुरवठा, कपडे धुण्यासाठी नसलेली प्रशस्त जागा आणि वाळविण्यासाठी कमी पडणाऱ्या दोऱ्या, हे याचे मुख्य कारण आहे. पण, झपाट्याने बदल स्वीकारणाऱ्या सातारा शहरात अजूनही घटस्थापनेआधी पारंपरिकता जपली जातेय, हेही नसे थोडके. (प्रतिनिधी)
सातारा शहरात गेल्या काही दिवसांत पाण्याची ओरड आहे. त्याबरोबरच कपडे वाळत घालण्यासाठी अपुरी जागा या दोन्ही कारणांमुळे आम्ही दरवर्षी घटस्थापना आधी माहुलीच्या घाटावर कपडे धुण्यास आणतो. परिसरातील एक-दोनजणांना सोबत घेऊन आम्ही हे काम करतो. त्यामुळे वाहनाचे भाडे सर्वांना समान द्यावे लागते आणि कोणा एकावर त्याचा आर्थिक बुर्दंड पडत नाही.
- अनिल आवळे, बुधवार पेठ, सातारा
धुलाईनंतर : पोटपूजेचा थाट
सकाळी दहाच्या सुमारास घाटावर येणारे अनेकजण कपडे वाळेपर्यंत घाटावरच थांबतात. कपडे धुऊन झाल्यानंतर घरून आणलेले जेवण आणि बाहेरील काही पदार्थ एकत्र करून घाटावरच जेवणाची पंगत रंगते. वाहणारे वारे आणि नदीकाठ यामुळे जेवणही जास्त जात असल्याचे येथील लोकांनी सांगितले.