सातारा तासभर अंधारात
By Admin | Updated: January 6, 2015 00:49 IST2015-01-05T23:32:06+5:302015-01-06T00:49:15+5:30
दोन जखमी : टायर फुटून चारचाकी विद्युत खांबाला धडकली

सातारा तासभर अंधारात
सातारा : येथील केसरकर पेठेत सोमवारी रात्री चारचाकीचा टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. अपघातग्रस्त चारचाकी टायर फुटल्यानंतर दोन दुचाकींना धडकून एका विद्युत खांबाला धडकल्यामुळे सातारा जवळपास तासभर अंधारात गेला. दरम्यान, अपघातातील जखमी घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, चारचाकी (एमएच ११ बीएच ६१७४) या चारचाकीचा टायर केसरकर पेठेत फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी दोन दुचाकींना (एमएच ११ एक्स ५८३५ आणि एमएच ११ एजे १८२४) धडकून थेट विद्युत खांबाला धडकली.
धडक इतकी जोरात होती की चारचाकीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी धनंजय जांभळे येथेच होते.
त्यांनी तत्काळ या अपघाताची कल्पना शहर पोलीस ठाणे आणि ‘महावितरण’ला दिली. ‘महावितरण’चे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूपाली शिंदे, सोहम शिंदे अशी जखमींची नावे आहेत. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)