‘दरडीं’ची गोष्ट मोठी ... ‘सरी’ कथा मात्र अधुरी!

By Admin | Updated: September 15, 2014 23:25 IST2014-09-15T21:28:11+5:302014-09-15T23:25:10+5:30

महाबळेश्वर : सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी; परतीच्या पावसावरच मदार

'Dardeen' thing is big ... 'Suri' story is incomplete! | ‘दरडीं’ची गोष्ट मोठी ... ‘सरी’ कथा मात्र अधुरी!

‘दरडीं’ची गोष्ट मोठी ... ‘सरी’ कथा मात्र अधुरी!

सचिन काकडे - सातारा -महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा जरी समाधानकारक पाऊस झाला असला तरी पावसाने वार्षिक सरासरी अद्याप गाठली नाही. गेल्या वर्षी तालुक्यात एकूण २५३ इंच (६४०० मिलीमीटर) पाऊस पडला होता; मात्र यावर्षी आजअखेर केवळ २१४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वरला दरवर्षी सुमारे २६० ते २७० इंच पाऊस पडतो. यावर्षी जून महिला कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस वेळेवर न आल्याने महाबळेश्वरवर पाणीटंचाईचे संकट कोसळले होते. उशिरा पाऊस सुरू झाल्याने शेतीसह बऱ्याच घटकांवर याचा परिणाम झाला. यानंतर मात्र जुलै-आॅगस्टमध्ये तालुक्याला पावसाने झोडपून काढले. संपूर्ण जून महिन्यात केवळ ३०० मिलीमीटर तर जुलै-आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये महाबळेश्वरात ५००० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. असे असले तरी अजून महाबळेश्वरच्या पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत २४३ इंच (६१६३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी १५ सप्टेंबर अखेर २१४ इंच (५४४२ मिलीमीटर) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी पडलेल्या पावसाचा पल्ला गाठण्यासाठी अजूनही ३९ इंच म्हणजेच सुमारे १००० मिलीमीटर इतक्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या महाबळेश्वरात पावसाने दडी दिली असून, ऊन पडत आहे. परतीचा पाऊस झाला तरच पाऊस सरासरी गाठू शकतो.
‘दरडीं’ची धास्ती अधिक
यंदा सरासरी न गाठताही महाबळेश्वरला झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच ‘दरडी’सत्र सुरू झाल्याने याचा पर्यटनावर परिणाम झाला.
महाबळेश्वरकडे येणाऱ्या अंबेनळी घाटात एकदा, पसरणी घाटात तीनवेळा तर केळघर घाटात दोनवेळा मोठ्या दरडी कोसळल्या.
तिन्ही घाटांत दरडी कोसळण्याची गेल्या २०-२५ वर्षांतील ही पहिलीच घटना होती.

ऊन-पावसाचा खेळ...
महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. सध्या महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जरी अत्यल्प असली तरी बारमाही हंगाम असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाने उघडीप दिल्याने या ठिकाणी सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळत आहे.

Web Title: 'Dardeen' thing is big ... 'Suri' story is incomplete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.