‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी

By Admin | Updated: November 28, 2014 00:15 IST2014-11-27T21:24:48+5:302014-11-28T00:15:12+5:30

काखेत कळसा अन्... : सायकल दुकानातील टायरमधील पाणी टाकून देणाऱ्या तहसीलदारांच्या कार्यालयातच रोगाला आमंत्रण

Dangue mosquito factory in 'Tahsil' | ‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी

‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी

सातारा : राज्यभर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना जिल्हा प्रशासन डेंग्यूच्या उपाययोजनेबाबत जिल्हाभर प्रबोधन करत आहे. मात्र, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् आपण कोरडे पाषाण’ या उक्तीची प्रचिती सातारा तहसीलदार कार्यालयात येत आहे. कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य साठले आहे तर अवैध वाळू उपशाप्रकरणी जप्त केलेल्या बोटींमध्ये खराब पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. या साठलेल्या पाण्यात डासांची अंडी असल्याने भविष्यात येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सातारा तालुक्यातून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात दाखल होणाऱ्या नागरिकांनाही डेंग्यूची लागण झाली, तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण राहणार नाही.
सातारा शहरासह जिल्ह्यात जागोजागी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये फोटोसेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयाच्या आवारात साठलेली घाण दिसत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. केंद्र शासनाने एका बाजूला स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेत नागरिक हिरीरीने सहभागही घेत आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचे धडे शासकीय अधिकारीही जागोजागी जाऊन देत आहेत. मात्र, आपले कार्यालय स्वच्छ करण्याची सुबुद्धी त्यांना आतापर्यंत झालेली नाही. केवळ एक दिवस रस्ता झाडून वृत्त प्रसिद्ध झाले की मोहीम थांबवायची, ही राजकारणी बुद्धी शासकीय अधिकाऱ्यांनाही सुचल्याचेच यातून दिसते. त्यामुळे आधी आपला परिसर स्वच्छ करावा, त्यानंतर लोकांना स्वच्छतेचे धडे द्यावेत, अशी कोपरखळी लोक मारत आहेत.
दरम्यान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठातर्फे काही दिवसांपूर्वी या परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा घाणीचे साम्राज्य साठू लागले असल्याने आता पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस स्वच्छतेसाठी काढल्यास घाणीवर नियंत्रण येऊ शकते. (प्रतिनिधी)


अस्वच्छता करणाऱ्यांवर नियंत्रण अशक्य
जप्त केलेल्या बोटींतील पाणी काढले तर त्यांचे बूड खराब होण्याची शक्यता असल्यानं त्यातील पाणी काढलेले नाही. डासांचं तेल टाकून घेतलंय. कचरा कुंडी ठेवलीय तरीही लोक बाहेरच कचरा टाकतात. या परिसरात पाच ते सहा कार्यालये आहेत. या परिसरात नेहमी वर्दळ असते, त्यामुळे कोण घाण करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
- राजेश चव्हाण, तहसीलदार

Web Title: Dangue mosquito factory in 'Tahsil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.