‘तहसील’मध्येच डेंग्यूला आमंत्रण
By Admin | Updated: November 12, 2014 23:30 IST2014-11-12T20:56:46+5:302014-11-12T23:30:40+5:30
वडूज : कार्यालयामागे घाणीचे साम्राज्य; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

‘तहसील’मध्येच डेंग्यूला आमंत्रण
वडूज : राज्यभर डेंग्यूच्या आजाराने थैमान मांडले असताना आरोग्याच्या सतर्कतेसाठी मोठी मोहीम जिल्ह्यात राबविण्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांच्या दालनात सर्व प्रमुख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक गत आठवड्यात पार पडली. परंतु, त्याच दालनाच्या पाठीमागील भिंतीलगत भले मोठे गवताचे जाळे पसरले आहे. यामुळे येथे डासांचा वावर वाढला आहे.
खटाव तालुक्यातील मोठ्या गावांसह सर्वच गावांत या संदर्भात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या; परंतु प्रथमदर्शनी पंक्चर दुकानांपुढील टायरामधील साठलेले पाणी ओतून देण्यापलीकडे कोणतेही ठोस काम या मोहिमांद्वारे झालेले दिसून येत नाही. तालुक्याच्या मुख्यालयातच उघड्यावरील गटारे तुंबून ते पाणी अस्ताव्यस्त पसरले आहे.
या पाण्यामुळे तेथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या आवारात अस्वच्छतेच्या प्रमाण मोठ्या स्वरूपात असल्याचे संबंधितांना निदर्शनास आणूनदेखील जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात शेकडो कर्मचाऱ्यांसह दररोज हजारो लोक कामानिमित्त उपस्थित असतात; परंतु त्यांना येथील समस्यांची सवय अंगवळणी पडल्यामुळे कोणीही तक्रार करत नाही. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय असून, शौचालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्याच्या चर्चा आहेत. नवीन शौचालय बांधून इमारत तयार असली तरी पाण्याविना ते बंद अवस्थेत
आहे. पार्किंगसाठी आवारात कोठेच जागा नसल्याने वाहनधारकांची नेहमीच तारांबळ उडताना दिसत
आहे.
अवैध वाळूउपसा करणारी वाहने याच आवारात उभी केल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
जुन्या शौचालयाची दुरवस्था
तहसील कार्यालय परिसरात असणारे जुने शौचालय वापराविना बंद आहे. मात्र याठिकाणी खाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. याचा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
पाण्याअभावी नवे शौचालय बंद
दररोज शेकडो नागरिक तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र येथील शौचालय पाण्याअभावी गेली काही दिवस बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे.
आरोग्यविषयक जनजागृती मोहीम बैठकीच्या दालनात घाणीचे ढीग आणि डासांचा वावर वाढला आहे.
पाण्याअभावी महिला व पुरुषांचे शौचालय बंद अवस्थेत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पिण्याच्या पाण्याची ओरड असून पार्किंग ‘राम भरोसे’ आहे.
दाटीवाटीने व परिसरातील कचऱ्याच्या ढिगामुळे महिला कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कार्यालयाच्या परिसरातील खड्ड्यात (झाडे लावण्यासाठी) पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. यावर तहसीलदारांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.