बगाड यात्रेच्या तोंडावर धोक्याची घंटा
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:24:51+5:302016-03-16T08:29:48+5:30
बावधन बसस्थानक दुर्लक्षाच्या फेऱ्यात : शालेय विद्यार्थी, प्रवाशांना धोका; दुर्घटना घडायची पाहिली जातेय वाट--एस्टीला हवाय धक्का - दोन

बगाड यात्रेच्या तोंडावर धोक्याची घंटा
तानाजी कचरे -- बावधन --दुर्गंधीने वाढलेला बावधन बसस्थानक परिसर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. विशेषत: या परिसरातच बावधन हायस्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण धोकादायक बनले आहे.
शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले लघुशंकेकरिता तिथे जात असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. अवकाळी येणाऱ्या पावसात आडोसा म्हणूनही प्रवासी या ठिकाणी जात असल्याने अशावेळीही या ठिकाणी एखादा अपघात होऊ शकतो.
गावातील विद्यार्थी अथवा प्रवाशांचा जीव गेल्यावरच परिवहन प्रशासन जागे होणार का? बसस्थानकाची पडलेली इमारत धोकादायक बनली आहे. ही पाडून या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बावधन गाव व परिसरातील मुले या ठिकाणच्या शाळेत शिकण्याशाठी येतात. पालक आणि शिक्षक मंडळी यांनीही या बाबत ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रार केली आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर जाण्यास मज्जाव केला असला तरी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस मुले तेथे रेंगाळतात. तेथील घाण आणि दुर्गंधी याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. येथे शेजारीच ओढा असल्याने साप आणि विंचवाचीही भीती आहे. त्यासाठी मोडकळीस आलेले बसस्थानक आसपासचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालकांचा दबाव वाढत आहे.
उन्हातान्हात ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवाशांचे बसस्थानकांच्या दुरवस्थेबाबत नाराजी आहे. विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या सुरक्षेची हमी परिवहन विभाग घेणार का? हाच प्रश्न आहे. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत अनेकदा पत्रव्यवहार होऊनही परिवहन खाते अजून गप्प का? असा सवालही उपस्थित होत आहे. ( क्रमश:)
माजी विद्यार्थी सरसावले..
गावातील माजी विद्यार्थी संघटना यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे दर्शविले आहे. तसा पत्रव्यवहार त्यांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याआधी हा परिसर अपघात मुक्त व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.