दूषित पाण्याने रोगांचे थैमान!
By Admin | Updated: October 21, 2014 23:44 IST2014-10-21T22:01:56+5:302014-10-21T23:44:02+5:30
वाठार स्टेशनला अस्वच्छता : ग्रामपंचायत सदस्यांकडूनच ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दूषित पाण्याने रोगांचे थैमान!
वाठार स्टेशन : वाठार स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तुंबलेल्या गटारांमुळे तसेच सार्वजनिक हातपंप, शौचालये व स्वच्छताग्रहांमध्ये पाणी साठून राहिल्याने ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. याला ग्रामसेवकाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करणारे निवेदन ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले असून, याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गावात सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा रोगांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. आरोग्याबाबतच्या कोणत्याही सुविधांची खबरदारी न घेतल्याने ही परिस्थिती उद््भवल्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप आहे. वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अनेक ठिकाणची गटारे दोन वर्षांत स्वच्छ केली गेली नाहीत. तसेच सार्वजनिक हातपंपाचा परिसर, कचराकुंड्यांच्या साफसफाईची काळजी घेतली जात नाही. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी वाहिनीही अनेक ठिकाणी फुटली आहे. तसेच शाळेच्या बाजूची गटारे तुंबल्याने डेंग्यूच्या डासांचा फैलाव झाला आहे. ग्रामस्थांच्या जीविताशी खेळणाऱ्या या दुर्लक्षाबाबत ग्रामसेवकाला वेळोवेळी सूचना करूनही ग्रामसेवकाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणात त्याला जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सहा सदस्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर नामदेव जाधव, बळीराम काळोखे, संभाजी दोरके, इरफान पठाण, उपसरपंच भीमाशंकर अहिरेकर, जास्मिन पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
ंचार दिवसांत २३९ रुग्ण
वाठार स्टेशन गावात चार दिवसांत २३९ रुग्णांना तापाचा आजार झाला आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून, संबंधित ग्रामपंचायतीला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच येणारा ताप मलेरिया, टायफॉइड, की डेंग्यू हे निश्चित करण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रायबोले यांनी दिली.