मंगळवार तळ्यातून दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा सुरू
By Admin | Updated: November 25, 2014 23:59 IST2014-11-25T22:08:36+5:302014-11-25T23:59:39+5:30
दखल : नाकाचा रुमाल दूर होण्याची चिन्हे; पाणी कमी झाल्यावर स्वच्छता--लोकमतचा दणका

मंगळवार तळ्यातून दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा सुरू
सातारा : मंगळवार तळे परिसरामध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून तळ्यातील पाण्याची दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन पालिकेने मंगळवार तळे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मंगळवार तळ्याच्या प्रदूषणासंदर्भात ‘लोकमत’ने अनेकवेळा भूमिका मांडली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्यापासून पालिकेच्या अनेक पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच यंदा तळ्यात विसर्जन करायचे नाही, असा पवित्रा घेतला होता. परंतु गणेशोत्सव मंडळांच्या आग्रही भूमिकेनंतर मंगळवार तळ्यात अखेर विसर्जन करण्यास परवानगी मिळाली.
विसर्जनानंतर महिनाभरात तळे स्वच्छ करून गाळ काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे हे काम ठप्प झाले होते, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. आता मात्र पालिकेने मंगळवार तळे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तळे स्वच्छ करण्याचे टेंडर एकाला देण्यात आले आहे. तळ्यातील सर्व पाणी कमी झाल्यानंतर तळे स्वच्छ करण्यात येणार आहे. सध्या मंगळवार तळ्यातील मोरी उघडण्यात आली आहे. या मोरीतून राजवाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. रहिवशांची भांडी, दागिने काळे पडू लागले आहेत.
मात्र, पाणी कमी होईपर्यंत नाइलाज आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)
मंगळवार तळे स्वच्छ करण्याच्या कामास मंजुरी दिली आहे. यासाठी निधीही उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आले असून, पाणी कमी होताच स्वच्छता करण्यात येणार आहे.
- अभिजित बापट
मुख्याधिकारी, सातारा पालिका