३५५ ठिकाणी डेंग्यूसदृश अळ््या
By Admin | Updated: July 16, 2014 22:55 IST2014-07-16T22:47:52+5:302014-07-16T22:55:10+5:30
मसूर : आरोग्य पथकाची घरोघरी तपासणी

३५५ ठिकाणी डेंग्यूसदृश अळ््या
जगन्नाथ कुंभार- मसूर
मसूर येथे दोन डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राने पाच पथकाद्वारे घरोघरी सुरू केलेल्या पाणीसाठा तपासणीत ३५५ पाणीसाठ्यात डेंग्यूसदृश आळ्या आढळून आल्या. तसेच त्या तातडीने आरोग्य विभागाने नष्ट केल्या व डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या व परिसर स्वच्छतेच्या नागरिकांना सूचना करण्यात आल्या.
काही दिवसांपूर्वी मसूर येथे दोन डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. याची तत्काळ दखल घेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. डी. एस. गंबरे व कीटकसंहारक डॉ. डी. के. जांभळे यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन विशेष सूचना केल्या होत्या.
त्यानुसार डॉ. रमेश लोखंडे यांनी पाच पथके, दहा कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत गावातील १,७२२ घरांमध्ये भेटी देऊन २८३४ पाणीसाठ्यांच्या (कंटेनर) तपासण्या केल्या. त्यामध्ये १८२ घरांत अनेक दिवस पाणीसाठे असलेल्या ३५५ पाणीसाठ्यात डेंग्यूसदृश आळया आढळून आल्या. पाणीसाठे साफ करण्यात आले तसेच काही ठिकाणी आबेट पावडरचा वापर करून आळ्या नष्ट करण्यात आल्या. तसेच डास उत्पत्ती होऊ नये, स्वच्छतेबाबत योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी केले. तसेच मसूर ग्रामपंचायत व आरोग्य केंद्र मसूर यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या कीटकजन्य साथरोग प्रतिबंधक माहितीपत्रकांचे वाटपही घरोघरी करण्यात आले.
या पथकामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रमेश लोखंडे, डॉ. करिष्मा सव्वानूर, आरोग्य सहायक व्ही. एच. शिंदे, कल्पक ठमके, संदीप जाधव, अरुण साळुंखे, सुनील साळुंखे, वंदना ढेबे, मनीषा पाटील, ज्योती जाधव, शुभांगी माळी, एम. एम. मुळीक, के. एच. खोचे यासह आशा स्वयंसेविका आदी विशेष परिश्रम घेत आहेत.