खंबाटकी घाटात धोकादायक डोंगरकड्यांची धडकी कायम....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:34+5:302021-06-16T04:50:34+5:30
खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या डोंगरकड्यांचा धोका कायम आहे. त्याचबरोबर घाटाचे संरक्षक कठडे ...

खंबाटकी घाटात धोकादायक डोंगरकड्यांची धडकी कायम....
खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या डोंगरकड्यांचा धोका कायम आहे. त्याचबरोबर घाटाचे संरक्षक कठडे काही ठिकाणी धोकादायक असल्याने त्यामुळे वाहनचालकांनी घाट चढताना सतर्कता तर बोगदा ओलांडल्यानंतर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. खंबाटकीतील उंच कडे प्रवाशांना धडकी भरवणारे ठरत आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खंबाटकी घाटातील रस्त्याच्या सुविधांकडे लक्ष वेधले जात आहे. खंबाटकी घाटात गतवर्षापूर्वी महाप्रलयानंतर पावसाच्या पाण्याने दरड वाहून पुन्हा रस्त्यावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी घाटात पोखरलेले डोंगरकडे सिमेंटच्या गिलाव्याने संरक्षित केले आहेत. तरीही हे काम अपूर्ण असल्याने दरड कोसळण्याची भीती अद्यापही कायम आहे. छोटे-छोटे दगड निसटून खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी भर पावसात आपली वाहने डोंगरकड्याच्या बाजूने चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे.
खंबाटकी घाटातील डोंगरउतारावरून कोसळणाऱ्या पाण्याने महामार्गाच्या घाटरस्त्यावर डोंगर कठडे कोसळून रस्त्यावरच येत असतात. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी घाटातील ही परिस्थिती सुधारण्याचा व विनाअडथळा वाहतुकीसाठी प्रशासन दक्ष असते.
एका बाजूला घाटातून दरड कोसळण्याची भीती असताना दुसऱ्या बाजूला वळणाचा धोकासुद्धा कायम आहे. काही वळणावर सिमेंट कठडे व त्याच्या आतून लोखंडी ग्रील केले आहे, तरीही वेगाने येणारी वाहने कठडे तोडून अपघातग्रस्त होतात. सध्या येथे नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या वळणावर भर पावसाळ्यात सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.
चौकट..
घाटातील खामजाई मंदिराच्या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. अर्धवट पोखरलेले कडे तसेच आहेत. शिवाय दरीच्या बाजूने कठडे सुरक्षित नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या वाहतुकीला अडचणी येत असतात. वाहनचालकांनी या जागी वाहने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यास ते जिवावर बेतू शकते. प्रशासनाकडून रखडलेल्या उर्वरित कामावर मार्ग काढणे गरजेचे आहे.
१४ खंडाळा
पुणे-सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात कोसळण्याच्या स्थितीत असणाऱ्या डोंगरकड्यांचा धोका कायम आहे.