महामार्गावरील धोकादायक छेद रस्ते बंद करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:26+5:302021-09-07T04:46:26+5:30
वेळे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा महामार्गावरील धोकादायक असलेले व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बंद करण्याची ...

महामार्गावरील धोकादायक छेद रस्ते बंद करावेत
वेळे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते सातारा महामार्गावरील धोकादायक असलेले व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. धोकादायक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते अपघातांना आयतेच निमंत्रण देत आहेत. याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी हे छेद रस्ते कायमचे बंद करणे गरजेचे आहे.
पुणे ते सातारा महामार्गावर अनेक ठिकाणी छेद रस्ते आहेत. महामार्गावरील प्रत्येक गावच्या ठिकाणी हे छेद रस्ते बनवले गेले आहेत; परंतु काही ठिकाणी हेच छेद रस्ते अत्यंत धोकादायक तर काही ठिकाणी आवश्यकता नसताना बनवले गेले आहेत. याच ठिकाणी अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः सातारा जिल्हा हद्दीतील शिरवळ ते सातारा या महामार्गावरील छेद रस्ते अत्यंत धोकादायक म्हणून समजले जातात. यामध्ये शिरवळ, खंडाळा, कवठे, सुरुर, पाचवड आदी ठिकाणचे काही छेद रस्ते महामार्ग प्राधिकरणाने कायमस्वरूपी बंद केले आहेत. मात्र, अपघातांचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण केलेल्या वेळे गावच्या हद्दीतील अत्यंत धोकादायक व अनावश्यक ठिकाणी बनवलेले छेद रस्ते बरेच अपघात होऊनदेखील अजूनही बंद करण्यात आले नाहीत. यामागे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नक्की कोणता उद्देश असेल?
खंबाटकी घाट उतरल्यानंतर तीव्र उतारावरून वाहने सुसाट वेगाने येतात. याच उतारावर असलेल्या वेळे गावच्या हद्दीत पाच ते सहा छेद रस्ते आहेत. हे सर्वच छेद रस्ते अत्यंत धोकादायक आहेत. आजपर्यंत याच छेद रस्त्यावरून जाताना अनेक भीषण अपघात होऊन अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामध्ये येथील स्थानिकांचादेखील समावेश आहे. याबाबतच्या अनेक नोंदी भुईंज पोलीस ठाण्यात आढळून येतील. म्हणूनच महामार्गावर सर्वात जास्त अपघात होणारे ठिकाण म्हणून वेळे परिचित आहे. एकीकडे अपघात रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. मात्र त्याला अपवाद म्हणून की काय, महामार्गावरील अनेक धोकादायक छेद रस्ते अजूनही खुले ठेवण्यात आले आहेत.
चौकट..
स्थानिक पोलिसांच्या नोंदीचा आधार घ्यावा...
सुट्टीच्या दिवसात या महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तसेच वेगात असलेली वाहने छेद रस्त्यावरून जाताना वाटेत आडव्या येणाऱ्यांना ठोकर देतात आणि यातूनच अपघातांची मालिका तयार होते. ही अपघातांची मालिका रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने शिरवळ, खंडाळा, पाचवड आदी वर्दळीच्या ठिकाणांप्रमाणेच सर्वच धोकादायक छेद रस्ते तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत. यासाठी स्थानिक पोलिसांच्या नोंदीचादेखील आधार घ्यावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एवढी तत्परता दाखवली तरी अपघातांच्या संख्येत निश्चितच कमालीची घट होणार असून, पोलीस यंत्रणेवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.