हाताच्या अंतरावर घोटाळतोय मृत्यू !
By Admin | Updated: April 23, 2015 00:49 IST2015-04-22T21:41:36+5:302015-04-23T00:49:43+5:30
कोरेगावात ग्रामस्थांच्या जीवाला धोका : रस्त्यावर लोंबकळतायत वीजतारा; खांबही झुकले; ग्रामपंचायतीच्या ठरावाला

हाताच्या अंतरावर घोटाळतोय मृत्यू !
अधिकाऱ्यांकडून केराची टोपली
कार्वे : कार्वे येथून कोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत विजेचे खांब असून, या खांबावरील तारा सध्या लोंबकळत आहेत. हाताच्या अंतरावर तारा लोंबकळत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांसह शेतकरी व ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करून वीज कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
कऱ्हाड-तासगाव मार्गापासून कार्वे ते कोरेगाव रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून साकारण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याने मूळ रस्त्यापेक्षा या रस्त्याची उंची तीन ते चार फुटांने वाढली आहे. विजेचे खांब रस्त्यानजीकच आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने सध्या वीजतारा सात ते आठ फुटांवर आल्या आहेत.
रस्त्यावर उभे राहून हात वर केल्यास तारा हातामध्ये येतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यानजीक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरून प्रवास करणेही धोक्याचे बनले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये अनेकवेळा ठराव केले. ठरावाची प्रत वीज कंपनीला देण्यात आली. मात्र, गत दोन वर्षांपासून वीज कंपनीने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सध्या वादळी वारे व पावसाचे दिवस आहेत.
खांब अथवा विजेच्या तारा कधी तुटून पडतील, हे सांगता येत नाही. रस्त्यापासून विजेच्या तारा फारच कमी अंतरावर असल्याने ग्रामस्थांच्या डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखी परिस्थिती आहे.
काही ठिकाणचे खांब व तारा असून, गंजल्या आहेत. खांब काही ठिकाणी कोलमडले आहेत. तारा तुटण्याच्या अवस्थेत आहेत. याबाबतही येथील ग्रामस्थांनी वडगाव वीज कार्यालयात तसेच मुंढे येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र,
तरीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. (वार्ताहर)
आम्ही अनेकदा धोके टाळले...
विजेच्या तारा जमिनीपासून थोड्या अंतरावर असल्याने शेतातून ऊस वाहतूक करणे कठीण झाले आहे. शेतातून ऊस बाहेर काढताना मोठी खबरदारी घ्यावी लागते. अनेकदा आम्ही धोके टाळले आहेत. मात्र, दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- मयूर सावंत,
उपसरपंच, कोरेगाव
कोरेगाव येथील ग्रामस्थांनी धोकादायक वीज खांब व तारांबाबत आमच्याकडे तक्रार केली आहे. आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून साहित्याची, मजुरांची पूर्तता करण्यात आली नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून पूर्तता झाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही.
- रवींद्र धर्मे, कनिष्ठ अभियंता