व्यापाऱ्यांचं हित जोपासणाऱ्या केंद्राचा कारभार धोकादायक
By Admin | Updated: November 19, 2015 00:42 IST2015-11-19T00:01:48+5:302015-11-19T00:42:04+5:30
पृथ्वीराज चव्हाण : आचरेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

व्यापाऱ्यांचं हित जोपासणाऱ्या केंद्राचा कारभार धोकादायक
ढेबेवाडी : ‘शेतकऱ्यांच्या दु:खापेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या केंद्रशासनाची चातुर्यवर्णाकडे वाटचाल चालू आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून देशाला पेशवाईकडे घेऊन चाललेल्या शासनाचा कारभार धोकादायक असल्याची भीती,’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी देशात लोकाभिमूख सहकारची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आचरेवाडी-काळगाव, ता. पाटण येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतीक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, मधुकर पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवाराची संकल्पना आणली. राज्यातील वाड्या-वस्त्यांना टँकर दिले. दहा लाख जनावरांना छावण्यांद्वारे जीवदान दिले. स्मार्ट शहराची घोषणा करणाऱ्या शासनाने जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असून, काळ्या पैशाचे आश्वासन कोठे गेले? असा सवालही त्यांनी केला.’
वंदना आचरे यांनी प्रास्ताविक केले. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
सिंचन घोटाळ्यावर केले भाष्य...
चार वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडी शासन चालविताना कसरत करावी लागते. जनतेचे हित आणि पारदर्शकता आणताना काही मंडळी दुखावली तरीसुध्दा ‘सिंचन’ आणि ‘राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ’ बरखास्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरले. या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.’