कृष्णा नदीचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: February 9, 2015 00:43 IST2015-02-08T21:31:38+5:302015-02-09T00:43:16+5:30
राजेंद्रसिंह राणा : आपण आपण नदीची चिंता केली तरच नदी आपली करेल

कृष्णा नदीचे अस्तित्व धोक्यात
भुर्इंज : ‘कृष्णामाई धोक्यात आहे. उगमाच्या अवघ्या काही अंतरापासून असणारी ही परिस्थिती चिंताजनक आहे. आपण नदीची चिंता केली, तरच नदी आपली करेल. वेळीच सावध झालो नाही, भूमिका घेतली नाही, तर या नदीला आपण वाचवू शकणार नाही,’ अशी भीती जागतिक जलतजज्ज्ञ तथा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पाचवड, ता. वाई येथे बोलताना व्यक्त केली.गेली दोन दिवस डॉ. राजेंद्रसिंह वाई येथे होते. वाईहून पुण्याला जाताना त्यांनी पाचवड येथे येऊन कृष्णानदीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत मीना राणा, मकरंद शेंडे, मंदार शेंडे उपस्थित होते. चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार यांच्याकडून त्यांनी नदीच्या सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘नदीच्या पात्रात येथे आता जलपर्णी दिसत आहे. ही जलपर्णी म्हणजेच, या नदीसाठी धोक्याची पहिली घंटा आहे. गावांनी जागरूक होऊन आपली नदी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ग्रामसेवकच्या धर्तीवर आता जलसेवक गावोगावी निर्माण झाले पाहिजेत. ते म्हणाले, ज्यांच्याकडे पाणीच नाही, ते पाण्यासाठी तडफडतायत. तुमच्यापाशी मुबलक आहे, ते फक्त वाचवण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यावेळी वसंतराव जाधव, अप्पा मोहिते, विनायक गायकवाड, बबनराव काळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)
चिंधवलीत जलबिरादरीचे शिबिर
जयवंत पवार यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘तुमच्यासारख्या तरुणांनी या कामात सक्रिय झाले पाहिजे. ज्यांच्या मनात तळमळ आहे त्यांनी कृतिशील सहभाग या कामात घेतला पाहिजे. त्याला जयवंत पवार यांनी होकार देताच डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी चिंधवली येथे जलबिरादरीचे दोन दिवसांचे राज्यव्यापी शिबिर घेण्याची सूचना करून त्यावेळी आपण स्वत: पुन्हा एकदा येथे येऊ, असे सांगितले. त्यावर जलबिरादरीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जोशी यांनी येत्या एक-दोन महिन्यांतच या शिबिराचे आयोजन करण्यात येईल,’ असे जाहीर केले.