‘रोडरोमिओं’ना वेसण घालण्यासाठी दामिनी पथक
By Admin | Updated: March 20, 2016 23:23 IST2016-03-20T21:22:54+5:302016-03-20T23:23:56+5:30
वाई पोलिस : महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेसाठी उपक्रम; दुचाकीसह चार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

‘रोडरोमिओं’ना वेसण घालण्यासाठी दामिनी पथक
पांडुरंग भिलारे -- वाई शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असलेल्या तरुणींना रोडरोमिओंचा सामना करावा लागतो. अनेकदा महाविद्यालयीन तरुणांमध्ये राडा होतो. त्यामुळे तरुणी तणावाखाली वावरत असतात. येथे येणाऱ्या तरुणींना अभय मिळावे, यासाठी वाई पोलिसांनी ‘दामिनी’ पथकाची स्थापना केली आहे. या पथकात चार महिला कर्मचारी दुचाकींसह सामील असणार आहेत.
वाई शहरात माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भाग, शेजारील महाबळेश्वर, खंडाळा, जावळी व कोरगाव तालुक्यांतील काही गावांतून विद्यार्थी येत असतात. यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे येणाऱ्या तरुणींना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीशिवाय पर्यायच नाही.
बसने प्रवास करताना गावा-गावांतील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून येते़ अनेकदा याचे रूपांतर मारामारीत होते़ अनेक विद्यार्थ्यांना गंभीर मारहाण होऊन दुखापती ही झाल्या आहेत़ बसमधील या गटबाजीचे पडसाद बसस्थानक परिसर, महाविद्यालय मार्गावर तसेच महाविद्यालय परिसरात दिसून येतात़
रोडरोमिओंकडून तरुणींची होणारी छेडछाड ही नित्याची बाब बनली आहे़ या प्रकारांच्या तक्रारी वाई पोलिस ठाण्यात अनेक झाल्या आहेत़ मुलींची नित्याची छेडछाड ही पोलिस ठाण्यांसाठी डोकेदुखी बनल्याने या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून वाई पोलिस ठाण्याच्या वतीने महिलांचे ‘दामिनी’ पथकाची स्थापना केली आहे़
या दामिनी पथकाचे उद्घाटन अपर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे, पोलिस निरीक्षक रमेश गलांडे, उपनिरीक्षक प्रकाश खरात, शिरीष शिंदे उपस्थित होते.
चार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक वाईतील बसस्थानक परिसर, किसन वीर महाविद्यालय रोड व परिसर तसेच विविध माध्यमिक शाळा परिसर या भागात फिरत राहणार आहे़
या पथकांमुळे रोडरोमिआेंना जरब बसणार आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवतीकडून समाधान व्यक्त केले जात आहे़ या पथकाने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्याालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीची काळजी घेण्याचे काम महाविद्यालयाचे प्रशासन म्हणून करत असतो़ हल्ली विविध ठिकाणी छेडछाडीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसते़, छेडछाडीचे असे प्रकार महाविद्यालयाच्या परिसराबाहेरही घडत असतात. आम्हाला प्रत्येक मुलगी घरी जाईपर्यंत काळजी वाटत असते़ वाई पोलिस प्रशासनाने सुरू केलेले ‘दामिनी’ पथकामुळे अशा प्रकारांना आळा बसेल़ हा उपक्रम स्तुत्य आहे़
- प्राचार्य डॉ़ चंद्रशेखर येवले, प्राचार्य, किसन वीर महाविद्यालय वाई
उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे, पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ‘दामिनी’ महिला पथकामध्ये आम्ही चार कर्मचारी असून, महाविद्यालयीन युवतींबाबत होणारे छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसर, शाळा, महाविद्यालयाला जाणारे रस्ते व परिसरामध्ये पेट्रोलिंग करून दोषींवर कडक कारवाई करणार आहे.
- स्नेहल शिंगटे, पोलिस कॉन्स्टेबल, दामिनी पथक प्रमुख
कॉलेजच्या विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान तसेच बसस्थानक, शाळा, महाविद्यालयाचे परिसर तसेच रस्त्यांनी जाताना छेडछाडीला सामोरे जावे लागते. वाई पोलिसांनी सुरू केलेल्या ‘दामिनी’ महिला पथकामुळे या प्रकारांना आळा बसून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
- मनीषा जाधव, महाविद्यालयीन युवती