पावसामुळे कडधान्यासह सोयाबीन-भुईमुगाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:17+5:302021-09-17T04:47:17+5:30
मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ...

पावसामुळे कडधान्यासह सोयाबीन-भुईमुगाचे नुकसान
मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे सोयाबीन व भुईमुगाचे पीक धोक्यात आले आहे. कडधान्याच्या पिकांचे वाटोळे झाले, तर हायब्रीड काळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भात पिकासह भाजीपाला पिकांच्या शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यावर्षी खरीप हंगामात काही महिने सलग पडलेल्या हंगामी पावसामुळे सर्वत्र पिके चांगली आली आहेत. काही ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी उपमार्ग जलमय बनले आहेत, तर बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. रानात काही ठिकाणी काढणीयोग्य, तर काही ठिकाणी काढलेल्या कडधान्याची पिके भिजून शेतातच कुजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह भुईमूग पिकाच्या पूर्ण तयार झालेल्या शेगांना काही ठिकाणी कोंब आले आहेत. तसेच हायब्रीड ज्वारीचे पीक ऐन हुरड्यात आहे, पण सतत पडत असलेल्या पावसामुळे हे पीक काळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
चौकट..
भाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
पालक, मेथी, कोथिंबिर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारली ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांतही पाणी साचून नुकसान झाले आहे. तसेच भेंडी, गवारी यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार दिवसांतील वरचे वर पडत असलेल्या पावसामुळे रानात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फोटो कॅप्शन
१६मलकापूर
मलकापूर परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)
160921\img-20210914-wa0027.jpg
फोटो कॕप्शन
गैली चार दिवस सततधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीन च्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे.(छाय माणिक डोंगरे)