वानरांकडून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:30+5:302021-02-05T09:13:30+5:30
तांबवे : सुपने परिसरात हंगामातील पिकांचे वानरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. तसेच गावठाणातही वानरांच्या टोळीने शिरकाव केला ...

वानरांकडून नुकसान
तांबवे : सुपने परिसरात हंगामातील पिकांचे वानरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. तसेच गावठाणातही वानरांच्या टोळीने शिरकाव केला असून त्यांच्याकडून घरांच्या छतांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आली आहेत. त्यातच वानरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
कूपनलिका बंद (फोटो : ०१इन्फो०२)
ढेबेवाडी : विभागातील अनेक गावांमध्ये सध्या कूपनलिका बंद स्थितीत आहेत. वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक गावांमध्ये कूपनलिका आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, कूपनलिका असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. कूपनलिकांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
स्मशानभूमीत कचरा
कऱ्हाड : येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. स्मशानभूमी परिसरात दुर्गंधीयुक्त कचरा साचला असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमी परिसराच्या स्वच्छतेकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्याकडेला पार्किंग
पाटण : नो-पार्किंगचे फलक असतानाही शहरात ठिकठिकाणी वाहनधारकांकडून बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आपली वाहने नो-पार्किंगमध्ये पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन होत आहे. पोलिसांनी नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.