शेतरस्ता अडविल्याने आंतरपिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:20+5:302021-09-02T05:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व ...

शेतरस्ता अडविल्याने आंतरपिकाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेसावळी : सरबांधावरील रस्ता अडविल्याने शेतातील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर व तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी अरविंद शिंदे व सुनीता शिंदे या शेतकरी दाम्पत्याने केली आहे. दरम्यान, नुकसानभरपाई व संबंधितावर कोणतीच कारवाई न झाल्यास गुरुवार, दि. २ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे.
शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमची राजाचे कुर्ले येथे शेतजमीन आहे, परंतु या शेतजमिनीकडे जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविला आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी तहसीलदार वडूज यांना विनंती अर्ज केले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतातील फळबाग व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ता अडविणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. आम्हाला न्याय दिला नाही. केळी, डाळिंब आदी फळबागेचे व कांदा, पावटा, भेंडी अशा आंतरपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता अडविल्यामुळे हजारो रुपये खर्चून शेतमजुरामार्फत शेतातील माल बाहेर काढला जात आहे. यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सरबांध रस्ता खुला करून द्यावा व झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.
फोटो- राजाचे कुर्ले येथे सरबांध रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांच्या फळ मालाचे झालेले नुकसान.