जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:46+5:302021-09-02T05:24:46+5:30
सातारा : कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा शल्यचिकित्सक हे दखल घेत नाहीत. फक्त ...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
सातारा : कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा शल्यचिकित्सक हे दखल घेत नाहीत. फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न रखडले आहेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात यावीत, अनुकंपा तत्त्वावरील चालू वर्षातील नेमणुका तात्काळ करण्यात याव्यात, १०, २०, ३० वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करून फरकासह द्यावी, सेवा पुस्तके तत्काळ भरावीत, शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय बिलाचे प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ मिळावीत, यासह अन्य मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. आरोग्य उपसंचालक, पुणे यांच्यासह झालेल्या बैठकीतही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण, प्रकाश घाडगे, बाळासाहेब चव्हाण, संजय पवार, अरविंद माळी, शुभांगी वायदंडे, विद्या कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.