राजकीय मिरवणुकांमध्येही ढोलताशाचा गजर
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:25:04+5:302015-11-04T00:08:28+5:30
डॉल्बी हद्दपार : ग्रामीण भागातही पारंपरिक वाद्यांना पसंती; व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजकीय मिरवणुकांमध्येही ढोलताशाचा गजर
तारळे : मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर नाचण्यासाठी वरती होणारे हात आता ढोल, ताशा व झांज वाजविण्यात मग्न असल्याचे दिसते. गणपतीनंतर दुर्गादेवी व आता राजकीय मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांतही हे चित्र आता दिसून येत आहे.
गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांन बगल देत डॉल्बीचा जणू पायंडा पाडला होता. डॉल्बीच्या दणदणाटामुळे तरूणाई वाममार्गाकडे वळण्याचे प्रकार घडत होते. डॉल्बीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या. भविष्यातील धोके ओळखून डॉल्बीच्याविरोधात आवाज उठला. ग्रामस्थांमधूनही याचे स्वागत झाले आणि याचाच परिपाक सध्याच्या मिरवणुकांमध्ये दिसून येत आहे. तारळेसारख्या ग्रामीण भागात हे चित्र अनेकांच्या भूवया उंचविणारे आहे.
डॉल्बी बंदीमुळे अनेक पारंपरिक वाद्ये बाहेर आली. परिणामी यंदाचे दोन्ही उत्सव आदर्शवत झाले. उत्सवाला आलेले वेगळे स्वरूप दिसून आले. डॉल्बीमुळे उत्सवाला लागणारे गालबोट यंदा बहूतांशी मिरवणुकांत दिसून आले नाही. तसेच महिलांचा मिरवणुकीतील मोठ्या प्रमाणातील सहभाग बरेच काही सांगून गेला. मिरवणुकीतील बिभत्सपणा यंदाच्या मिरवणुकीत दिसला नाही.
दुर्गा उत्सवानंतरही काही कारणास्तव मिरवणूका काढण्यात आल्या. मात्र, त्या मिरवणुकांमध्येही पारंपरिक वाद्यांवर भर देण्यात आला. काहींनी यंदा स्वत:ची ढोलपथके तयार केली आहेत. यामध्ये अनेक उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. (वार्ताहर)
अनेकांनी थाटली ढोल पथके
डॉल्बी बंदीच्या मोहिमेला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असल्याचे दिसते. डॉल्बीला बगल देत तरूणांनी हातात ढोल ताशा घेतला आहे. शहरी भागाच्या धर्तीवर ग्रामीण भागातही अनेक मंडळांकडून डॉल्बीऐवजी मिरवणुकीसाठी ढोल पथके स्थापन करण्यात येत आहेत. ढोल पथकांचा विशेष बाज बघून यापुढे अनेक मंडळांनी ढोल पथके स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.