कऱ्हाडात डॉल्बीबंदी...साताऱ्यात कधी?

By Admin | Updated: August 26, 2015 22:41 IST2015-08-26T22:41:34+5:302015-08-26T22:41:34+5:30

गणेशोत्सव तोंडावर : पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष--लोकमत इनिशिएटिव्ह

Dalby bandh in Karhad ... When in Satara? | कऱ्हाडात डॉल्बीबंदी...साताऱ्यात कधी?

कऱ्हाडात डॉल्बीबंदी...साताऱ्यात कधी?

सातारा : दोन दिवसांपूर्वी कऱ्हाडमध्ये झालेल्या गणेशोत्सव बैठकीत गणेश मंडळांना कसल्याही परिस्थिती डॉल्बी लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या. त्यामुळे कऱ्हाडमध्ये डॉल्बीबंदी निश्चित झाली आहे. मात्र ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहरात डॉल्बीबंदी कधी होणार, असा सूर आता सर्व सामान्यांमधून उमटू लागला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शहरात यंदा डॉल्बीमुक्तीचा नारा देण्यात आला; परंतु सातारा शहर अद्याप या निर्णयापासून कोसोदूर आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाची यावर नेमकी काय भूमिका असणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शहराचा खूप मोठा इतिहास आहे. येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक सण, उत्सव साजरे केले जातात. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्या एखादी अनुचित घटना घडली तरी साताऱ्यात त्याचे पडसाद उशिरा उमटतात, याचा अनेकांना अनुभव आहे. जुन्या परंपरा जपण्यास सातारा शहर नेहमी प्राध्यान्य देते. तसेच आधुनिकतेकडेही पाहण्याच्या दृष्टिकोन सातारकरांचा वेगळा आहे. याच साताऱ्यात एखादी परंपरा बंद करण्याच निर्णय होतो. तेव्हा राजकीय किंवा सर्वसामान्यांतून उठाव होऊ लागतो आणि इतर ठिकाणी अशा पंरपरा बंद झाल्या तरी साताऱ्यात मात्र त्या ‘एका’ आदेशाने सुरू असतात. त्यामुळेच यंदा कऱ्हाडला डॉल्बीबंदी झाली; पण साताऱ्यामध्ये होणार का? अशी संभ्रमावस्था आहे. त्याची कारणेही अनेक देता येतील. तत्कालीन पोलीस अधीक्षक फार कडक शिस्तीचे होते. त्यांनीही सातारा शहर डॉल्बीमुक्तीसाठी अनेक प्रयत्न केले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ‘तुम्हालाच जर बदलायचे नसेल तर तुम्ही तसेच राहा,’ असे हतबल होऊन त्यांनी सातारकरांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एखादा निर्णय प्रशासन घेत असेल तर समाजातून त्याला थोडाफार विरोध होऊ शकतो; परंतु एखादा निर्णयच रद्द करायचा, अशी परंपरा अलीकडे रुढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतरत्र कुठेही डॉल्बीमुक्ती झाली तरी सातारमध्ये होईल का? हे कोणालाही सांगता येणार नाही. एवढेच नव्हे तर पोलिसांनाही नाही. पुढील महिन्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्बीधारक आणि गणेशमंडळांच्या बैठकीची दुसरी फेरी होणार आहे. (प्रतिनिधी)

पोलिसांचाही पाठिंबा !
सातारा शहरात डॉल्बीमुक्ती व्हावी, अशी अनेक पोलिसांची मनापासून इच्छा आहे. मात्र त्यांना यासंदर्भात उघड बोलता येत नाही. डॉल्बीमुळे काय परिणाम होतात, हे पोलिसांनी जवळून अनुभवलेले असते. त्यामुळे डॉल्बीबंदीसाठी यंदा पोलीसही आग्रही आहेत.
गणेशोत्सवापूर्वी नाकाबंदी करा
सातारा शहरात सुमारे १४ डॉल्बीधारक आहेत. या डॉल्बीधारकांना पोलिसांनी समजावून सांगून यंदा डॉल्बी कोणालाही भाड्याने देणार नाही, अशी लेखी हमी त्यांच्याकडून घ्यावी. तसेच परजिल्ह्यातून डॉल्बी शहरात येत असते. गणेशोत्सवापूर्वी शहराबाहेर नाकाबंदी करून डॉल्बीला शहरात एन्ट्री देऊ नये, असे एका पोलीस कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

Web Title: Dalby bandh in Karhad ... When in Satara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.