दादाराजेंचीही जबाबदारी रामराजेंवरच!
By Admin | Updated: April 30, 2015 00:26 IST2015-04-29T23:23:22+5:302015-04-30T00:26:31+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : राष्ट्रवादीत महाभारताचे युद्ध --सांगा डीसीसी कोणाची ?

दादाराजेंचीही जबाबदारी रामराजेंवरच!
नसीर शिकलगार - फलटण -सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकपदासाठी यावेळी फलटण तालुक्यातून तीन उमेदवार उभे आहेत. एकंदरीत या लढतीचा विचार करता दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. मागील वेळेस तीन संचालक होते. मात्र, या वेळेस दोन संचालक असणार आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बॅँकेत गेल्या निवडणुकीत फलटण तालुक्यातून रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, विश्वासराव निंबाळकर हे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेमधून निवडून आले होते. तर यशवंतराव रणवे पराभूत झाले होते. निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने सोसायटी मतदारसंघातून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना तर कृषिप्रक्रिया मतदारसंघातून दादाराजे खर्डेकर यांना उमेदवारी दिली आहे.
रामराजेंच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रीय कॉँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे. फलटण तालुक्यावर रामराजेंचे एकहाती वर्चस्व आहे. बऱ्याच सोसायट्या त्यांच्या ताब्यात असून, या मतदारसंघातून त्यांना मोठा एकतर्फी विजय मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. सोसायटी मतदारसंघात रामराजेंचे पारडे जड आहे. या मतदारसंघात एकूण १२८ मतदार आहेत.
रामराजेंनी आग्रहाने कृषिप्रकिया मतदारसंघातून निकटचे सहकारी दादाराजे खर्डेकर यांना पुन्हा उमेदवारी मागून घेतली आहे. त्यांच्याविरोधात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील उभे आहेत. या मतदारसंघात फक्त ३० मतदार असून, त्यात सातारामध्ये नऊ, फलटणमध्ये आठ, कऱ्हाड चार, वाई दोन, कोरेगाव दोन तर पाटण, जावळी, महाबळेश्वर, खटाव आणि खंडाळ्यात प्रत्येकी एक असे मतदार आहेत. सातारा व फलटणच्या मतदारांच्या जोेरावर दादाराजे खर्डेकर विजयी होऊ शकतात, असे चित्र आहे.
प्रचारासह वैयक्तिक भेटीगाठींवर जोर
जिल्हा बॅँकेसाठी रामराजेंनी सभासदांचा मेळावा घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच ते वैयक्तिक संपर्कही साधत आहेत. दुसरीकडे त्यांचे विरोधक तुकाराम शिंदे यांनी व्यक्तिगत गाठी-भेटी घेत प्रचार सुरू ठेवला आहे. रामराजेंनी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. तर दादाराजे खर्डेकर यांची मदार रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंवर असल्याने त्यांच्या माध्यमातून दादाराजे खर्डेकरांचा प्रचार सुरू आहे.