रोजचा व्यायाम अन् कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:25+5:302021-05-23T04:38:25+5:30
तंदुरुस्तीचे गमक; काम मनापासून करायचं पण डोक्यात जाऊ द्यायचं नाही कोरोनाला डरोना असे म्हणत जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करत ...

रोजचा व्यायाम अन् कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा...!
तंदुरुस्तीचे गमक; काम मनापासून करायचं पण डोक्यात जाऊ द्यायचं नाही
कोरोनाला डरोना असे म्हणत जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. सकाळी लवकरच या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मोबाइल सुरू होतात ते रात्री मध्यरात्रीपर्यंत त्यांचा परिस्थिती हाताळण्यात या संदर्भाने मोबाइल सुरूच असतो. सतत प्रश्न आणि त्यासाठी शोधण्यात येणारी उत्तरे या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व्यायाम आणि कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पांना महत्त्व देत आहेत.
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठा ताण आहे. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी हे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम सध्या मोठ्या दिव्याला सामोरे जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जरी कोरोना बाधित रुग्ण कमी संख्येने आढळत होते तरीदेखील चीन, अमेरिका या देशांमधील परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने उपाय योजना हाती घेतल्या होत्या. तेव्हापासून चा ताण वाढत चालला आहे.
शंभर वर्षांनी निर्माण झालेली ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन कधी बरोबर निर्णय घेते तर कधी चुकाही करते. मात्र यातून तणावाची परिस्थिती निर्माण होते, कोणाला उत्तर द्यावं, कोण सर्वसामान्य माणूस बेडसाठी दवाखान्यात बाहेर उभा असतो, कुठे ऑक्सिजन संपलेला असतो, कुठे व्हेंटिलेटर बेडची सोय करावी लागते, तर नव्याने कोविड केअर सेंटर कुठे कुठे उभारले लागतात, अशा गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात म्युकरमायकोसिस या पश्चात आजारानेदेखील डोके वर काढल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
हा सर्व ताण घालवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी तर रात्री उशिरा घरी पोहोचतात. अनेकजण घरी पोहोचल्यावर शरीराची स्वच्छता करून कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. कोणी कॅरम खेळत, कोणी मुलांसोबत मुलांचा अभ्यास घेते, कोणी संगीताची आवड जोपासत आहे. दिवसभरात काही झालं बर असो अथवा वाईट, ही माहिती एकमेकांशी शेअर करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. तणाव बोलून दाखविल्यावर राहत नाही, असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यावर भर दिला आहे. कोणी व्यायाम करत आहे तर कोण आयुर्वेदिक उपचारांवर भर देत आहे. मिळालेल्या वेळेत संगीताचा आनंददेखील अनेक जण घेत आहेत. काहींनी तर प्रवासवर्णने, प्रसिद्ध कादंबऱ्या वाचल्या वर भर दिला हे वर्तमानपत्रांतील संपादकीय पान वाचून अनेकजण वास्तवाचे मूल्यांकन करतानाही दिसतात.
कोट..
मी पहिल्यापासूनच व्यायामाची आवड जोपासलेली आहे. कोरोना महामारी नसताना निसर्गात फिरणे, रोज सकाळी व्यायाम करणे या बाबींना मी पहिल्यापासूनच महत्त्व दिले. तणावातून मुक्तीसाठी लोक अनेक मार्ग शोधतात. मात्र व्यायाम करणाऱ्याला तणाव जाणवत नाही. लोकांनी लवकरात लवकर चाचणी केली तर हे त्यांच्या सर्वांच्या फायद्याचे आहे.
- रामचंद्र शिंदे,
अपर जिल्हाधिकारी सातारा
- सागर गुजर