दहिवडीचा वनपाल लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:00+5:302021-06-04T04:29:00+5:30
सातारा/दहिवडी : शिंदी खुर्द (ता. माण) येथील माती बंधाऱ्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी पोटठेकेदाराकडून दहा हजारांची लाच घेताना दहिवडीतील ...

दहिवडीचा वनपाल लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा/दहिवडी : शिंदी खुर्द (ता. माण) येथील माती बंधाऱ्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी पोटठेकेदाराकडून दहा हजारांची लाच घेताना दहिवडीतील वन परिक्षेत्राचा वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७, रा. सरकारी दवाखान्यामागे, गायत्री निवास दहीवडी) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार पोट-ठेकेदार हा शिंदी खुर्द येथे माती बंधाऱ्याचे काम करत आहे. या कामापोटी बिलाचा धनादेश देण्यासाठी सूर्यकांत पोळने संबंधित पोटठेकेदाराला दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार संबंधित पोटठेकेदाराने लाचलुचपतकडे केली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दि. २ रोजी याची पडताळणी करून सापळा लावला. वनपाल सूर्यकांत पोळने तडजाजोडीअंती ठरलेली दहा हजारांची लाच स्वीकारली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लाच रक्कम अज्ञातस्थळी फेकून दिली. त्यानंतर त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. परिसरात शोध घेतला असता रक्कम सापडली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी केली.