दहीहंडी सोहळा... निवडणुकीचा मेळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST2021-08-28T04:42:47+5:302021-08-28T04:42:47+5:30

दहीहंडी सोहळ्यातून आगामी काळातील तरुण नेतृत्व तयार होत असते. हा खेळच तरुणांशी संबंधित असल्याने हा वर्ग आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ...

Dahihandi ceremony ... Election fair! | दहीहंडी सोहळा... निवडणुकीचा मेळा !

दहीहंडी सोहळा... निवडणुकीचा मेळा !

दहीहंडी सोहळ्यातून आगामी काळातील तरुण नेतृत्व तयार होत असते. हा खेळच तरुणांशी संबंधित असल्याने हा वर्ग आपल्याकडे खेचून घेण्यासाठी नेहमीच राजकीय नेते प्रयत्न करत असतात. सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या नेत्यांना मानणारे नगरसेवक तसेच कार्यकर्ते दरवर्षी दहीहंडी सोहळे आयोजित करतात.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या सोहळ्यावर मर्यादा आली आहे. मात्र, साताऱ्यातील तालीम संघ, शनिवार पेठेतील बालगणेश मंडळ, रविवार पेठ, कर्मवीर पथावर ठिकठिकाणी दहीहंडी सोहळे आयोजित केले जातात. यंदा या सोहळ्यावर विरजण पडणार असल्याने नेतेमंडळींसह त्यांचे कार्यकर्ते निराश झाले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सोहळा दणक्यात आणि व्यापक पध्दतीने केला जातो. विशेषत: पालिकेची निवडणूक असते, तेव्हा त्याच्या आधीचा दहीहंडी सोहळा, गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. निवडणुकीसाठी इच्छुक असणारी नेतेमंडळी या सोहळ्याला ‘स्पॉन्सर’ करतात. दहीहंडीच्या स्थळावर या नेत्यांचे आकर्षक छबीतील बॅनर लागतात. बॅनरवर कोणत्या नेत्याचे छायाचित्र आहेे, त्यावरूनच संबंधित नेता पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.

गंमत म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने नेते प्रसन्न आहेत, म्हटल्यावर गल्लोगल्ली दहीहंडीची संख्या वाढते. युवावर्ग या निमित्ताने आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी खऱ्या अर्थाने दहीहंडी सोहळा कारणीभूत ठरतो. आता सातारा पालिकेची निवडणूक आगामी काळात होणार असल्याने असे सोहळे आयोजित करण्यासाठी नेत्यांवर दबाव वाढत असला तरी कोरोनाचे नियम असल्याने सोहळा आयोजित करता येणार नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

रात्री उशिरापर्यंत सोहळा...

दहीहंडी फोडण्याचा सोहळा सायंकाळी सुरू होतो, तो रात्री उशिरापर्यंत चालतो. डीजे लावून चालणाऱ्या या सोहळ्यासाठी नेत्यांचा आशीर्वाद असल्याने कार्यकर्तेही पाण्यात चिंब भिजत रात्री उशिरापर्यंत सोहळ्याचा आनंद लुटतात.

Web Title: Dahihandi ceremony ... Election fair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.