'दादा'गिरीविरुद्ध लढतच राहणार

By Admin | Updated: September 28, 2014 00:33 IST2014-09-28T00:33:07+5:302014-09-28T00:33:24+5:30

मुख्यमंत्री चव्हाण : 'कऱ्हाड दक्षिण'मधून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

'Dadaagiri will continue to fight against | 'दादा'गिरीविरुद्ध लढतच राहणार

'दादा'गिरीविरुद्ध लढतच राहणार

कऱ्हाड : ‘राज्यात आघाडी शासन चालविताना अनेक कठोर निर्णय घेतले़ अनेकांचे हितसंबंध त्यामुळे दुरावले़ कारभार करताना खूप त्रास झाला़ दोन दिवसांपूर्वी तर राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले; पण त्याचा माझ्यावर फरक पडत नाही़ सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़ 'कऱ्हाड दक्षिण'चे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला़ त्यानंतर आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते़ सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री डॉ़ पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, मोहनराव जाधव, अजित पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी युती तुटली अन् आघाडीतही बिघाडी झाली़ राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची केलेली मागणी म्हणजे सत्तेची वाटणी योग्य नव्हती़ खरंतर त्यांना आघाडी करायचीच नव्हती, फक्त युती तुटायची वाट ते पाहत होते़ युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तुटल्याचे जाहीर केले़ आघाडी तोडण्यापाठीमागचे कारण मतदारांनीच शोधण्याची गरज निर्माण झाली आहे़’ ‘कऱ्हाडात आता मला घेरण्यासाठी अनेकजण तुटून पडलेत़ कुणी टोप्या बदलल्यात, तर कुणी कपडेही बदललेत, कुणी गाठोडी घेऊनही आलेत; पण काही केले तरी कऱ्हाडच्या जनतेला कोणी आता भुलवू शकणार नाही़ माझ्याविरोधात अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत़ ती आव्हाने पेलण्याची ताकद कऱ्हाडकरांमध्ये आहे,’ असेही चव्हाण म्हणाले सतेज पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने राज्याला कणखर नेतृत्व मिळाले आहे़ ते नेतृत्व तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची कऱ्हाडकरांची जबाबदारी आहे, ती पार पाडा़ ‘बाबा तुम्ही राज्यात ‘बॅटिंग’ करा़ कऱ्हाडची जनता दक्षिणेत ‘फिल्डिंग’ करण्यात पटाईत आहे़’ यावेळी विश्वजित कदम, मदनराव मोहिते, आमदार आनंदराव पाटील, जयवंत जगताप, आदींची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Dadaagiri will continue to fight against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.