‘आम्ही सारे दाभोलकर’ने सातारा दणाणला
By Admin | Updated: August 20, 2015 21:45 IST2015-08-20T21:45:29+5:302015-08-20T21:45:29+5:30
निषेध फेरी : नरेंद्र दाभोलकर, शेख काका स्मृतिदिनी तरुणाई रस्त्यावर

‘आम्ही सारे दाभोलकर’ने सातारा दणाणला
सातारा : ‘फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, या घोषणांनी गुरुवारी सातारा शहर दणाणले. परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला गुरुवारी (२० आॅगस्ट) दोन वर्षे पूर्ण झाली. कॉ. गोविंद पानसरे यांचाही खून झाला. या दोन्ही खुनांमागे धर्मांध शक्तींचेच कारस्थान असूनही मारेकऱ्यांचा मागमूस लागलेला नाही. पुरोगामी चळवळीतील अनेकांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.डॉ. दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी व त्यामागचे सूत्रधार यांना शोधण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सर्व परिवर्तवादी संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकजुटीने रस्त्यावर उतरले होते. सकाळी गांधी मैदानापासून निषेध फेरीला सुरुवात झाली. यामध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. ‘शाहू, फुले, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे,’च्या घोषणांनी सातारा शहरातील रस्ते दणाणून निघाले. ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर याठिकाणी एमएसडब्ल्यूच्या मुलांनी गाणी म्हटली. येथे रिंगण नाट्याचा प्रयोग झाला. जिल्ह्यातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. प्रसन्न दाभोलकर, किशोर बेडकिहाळ, वसंत नलावडे, प्रशांत पोतदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)