ढेबेवाडी विभागात डॉल्बीमुक्तीचा गजर !

By Admin | Updated: September 11, 2015 23:40 IST2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T23:40:31+5:30

पोलिसांच्या हाती प्रबोधनाचा झेंडा : ‘एक गाव, एक गणपती’साठी प्रयत्न--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

Dabby ammunition alarm in Dhebewadi section! | ढेबेवाडी विभागात डॉल्बीमुक्तीचा गजर !

ढेबेवाडी विभागात डॉल्बीमुक्तीचा गजर !

ढेबेवाडी : डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेला ढेबेवाडी विभागातील गणेशमंडळांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने यावर्षी विभागात डॉल्बीला ब्रेक लागणार, हे निश्चित ! दरम्यान, ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी गावोगावी बैठका घेऊन ‘एक गाव, एक गणपती, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आणि दुष्काळग्रस्तांना मदत करा,’ असे आवाहन करत प्रबोधनाचा झेंडा हाती घेतल्याने गावोगावी आता डॉल्बीमुक्तीचा गजर होऊ लागला आहे. ढेबेवाडी विभाग म्हणजे पाटण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि दुर्गम परिसर. या विभागातील प्रत्येक गावातील बहुतेक कुटुंबांची मुंबईशी नाळ जोडल्याने गणेशोत्सवास वेगळेच महत्त्व असते. विभागात सुमारे ७० नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत. सामाजिक, धार्मिक आणि चालू घडामोडींवर जिवंत देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या येथील गणेशोत्सवास अलीकडे काही वर्षांपासून डॉल्बीचे ग्रहण लागल्याने परंपरागत गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचे चित्र होते. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आणि हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात विभागातील गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी कार्यकर्त्यांना डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले. या बरोबरच जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणि डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम, नैसर्गिक प्रदूषण याबाबत प्रबोधन केल्याने कार्यकर्त्यांनी या उपक्रमास दाद देऊन डॉल्बीमुक्तीचा निर्धार केला. या बरोबरच पोलीस प्रशासनाने तर आता गावोगावी जाऊन प्रबोधनाचे डोस सुरू केले आहेत.
कायदा मोडून प्रशासनाविरोधात जाणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही द्यायला पोलीस विसरले नाहीत.यामुळे विभागात डॉल्बीचा दणदणाट बंद होणार, हे स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)


समाजप्रबोधनाची आणि जिवंत देखाव्यांची शंभर वर्षांची परंपरा असलेल्या सणबूर गावात जवळपास नऊ गणेश मंडळे आहेत. या मंडळांनी नेहमीच राष्ट्रीय उपक्रमांना सहकार्य केले आहे. यापूर्वीही अपवाद वगळता सर्वच मंडळांनी डॉल्बीला कधीच थारा दिला नाही. यापुढेही कायद्यानुसारच आमचे सहकार्य राहील.
- सचिन जाधव, माजी सरपंच


प्रेमाचा डोस...
कायद्याचा बडगा !
कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी गणेशोत्सवापूर्र्वीच पेरणी सुरू केली आहे. गावागावांमध्ये बैठका घेऊन कार्यकर्त्यांना गणेशोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आवाहन करत चुकीच्या प्रथा आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही एन. आर. चौखंडे यांनी सांगितले.

डॉल्बीमालक हादरले !
डॉल्बीच्या आवाजाने संपूर्ण समाज हादरून टाकणारे डॉल्बीचालक मात्र कायदा आणि गणेश मंडळांच्या भूमिकेमुळे चांगलेच हादरले आहेत. डॉल्बीसाठी चढाओढ करणारी मंडळेच डॉल्बीमुक्तीसाठी पुढे येऊ लागल्याने यावर्षी डॉल्बीला मागणी नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: Dabby ammunition alarm in Dhebewadi section!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.