खासगी कंपन्यांचा ग्राहकांना चुना !
By Admin | Updated: November 15, 2015 23:43 IST2015-11-15T20:28:17+5:302015-11-15T23:43:45+5:30
एजंटांची भीतीने गाळण : पाटण तालुक्यात पैसा जमा केला; कमी कालावधीत ‘दामदुप्पट’चे आमिष

खासगी कंपन्यांचा ग्राहकांना चुना !
अरुण पवार -- पाटण ‘कमी कालावधीत दामदुप्पट करून देतो, विमानाने गोव्याला जायचे, आमची कंपनी हॉटेल व्यवसाय करते, तुम्हालाही परदेशात नेऊ,’ अशा प्रकारची आमिषे दाखवून लोकांना लाखो रुपये गुंतवण्यास भाग पाडले गेले. खासगी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरणारे एजंटांचे जाळे गावोगावी निर्माण करून पाटण तालुक्यातील जनतेकडून खोऱ्याने पैसा गोळा केला. आता मात्र, आज ही कंपनी बंद झाली. उद्या ती बंद झाली, अशा बातम्या कानावर येऊ लागल्यामुळे तालुक्यातील जनतेला कोट्यवधीचा चुना लागणार ही भीती व्यक्त केली जात आहे.
पाटण तालुक्याच्या गावागावात एजंटाच्या टोळ्या निर्माण करून त्यांची साखळी केली गेली. या एजंटाना कंपन्यांनी आकर्षक कमिशन व परदेशी वारी व आमिषे दाखवली गेली. मग एजंटांनी स्वत:ला ‘अप टू डेट’ बनवून रात्रीचा दिवस केला. घराघरात जाऊन बैठका घेतल्या. कंपन्यांची उच्च प्रतीची रंगीत पत्रके आणि कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे चित्र लोकांच्या मनावर बिंबवले आणि त्याच गावातला आणि ओळखीचा एजंट असल्याने त्याच्यावर लोकांनी भरवसा ठेवला. यातूनच एकेकाने लाखोंची रक्कम अशा खासगी कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. काहींनी तर बँका, पतसंस्थांमधील ठेवी काढून खासगी दलालांच्या स्वाधीन केल्या आहेत. आता कंपन्या बंद पडू लागल्या आहेत. यामुळे दलाल तोंड दडवून आहेत. काहींनी तर गायब होण्याचा मार्ग अवलंबिला आहे.
तक्रार करायची कोणाकडे आणि कुणावर ?
आपली फसवणूक झाली. गुंतविलेले पैसे परत मिळत नाहीत, अशी खात्री आणि अनुभव आल्यानंतर याविरोधात दाद मागण्यासाठी कोणाकडे तक्रार करायची आणि कोणाविरुद्ध करायची अशा संभ्रमात पाटण तालुक्यातील गुंतवणूकदार आहेत. आता अशा अनेक गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच येथील ग्रामस्थ यापुढे आमिषांना बळी पडणार नाहीत.
जमिनी विकून
पैसे दिले...
मोरणा परिसरात नुकताच पवनऊर्जा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे डोंगरपठारावरील शेतकऱ्यांनी कंपन्यांना जमिनी विकल्या. त्याबदल्यात मिळालेल्या लाखोंंच्या रकमा अशा खासगी एजंटाकडे गुंतवणुकीसाठी अनेकांनी दिल्या आहेत. आता, मात्र कंपन्या बंद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
गोंडस नावे देऊन खासगी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे कोणीही तुमच्या दारात आले तरी अशांना बळी पडू नका. कारण अनेक बड्या-बड्या कंपन्या बंद पडल्या, याची ताजी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तेव्हा खासगी एजंटांना थारा देऊ नका, यापुढे तरी सावध राहा.
- प्रतीक पाटील, नागरिक सेवाभावी संस्था, पाटण