अंमलीसाठाप्रकरणी सॅम्युअल पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 22, 2015 00:16 IST2015-05-21T22:13:17+5:302015-05-22T00:16:25+5:30
११२ किलो २९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) चा अंमली पदार्थांचा साठा सातारा पोलिसांनी हस्तगत केला होता.

अंमलीसाठाप्रकरणी सॅम्युअल पोलिसांच्या ताब्यात
शिरवळ : कण्हेरी, ता. कराड येथे पोलीस हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे सापडलेल्या २२ कोटी ४० लाख ९१ हजार ९५० रुपयांच्या एम. डी. (मेफेड्रॉन) चा ११२ किलो २९ ग्रॅमच्या साठ्याप्रकरणी खंडाळा पोलिसांना या चैनमधला महत्त्वाचा दुवा ग्यान मनिक्कम सॅम्युअल (वय ४०, रा. न्यू गणेशनगर, विद्यालंकार कॉलेजजवळ, वडाळा, पूर्व मुंबई) हाती लागला आहे. याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी सॅम्युअल याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सॅम्युअल याला पोलिसांनी खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार, दि. २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खंडाळा तालुक्यातील कण्हेरी येथे मुंबई येथे पोलीस दलात असणाऱ्या धर्मराज बाबूराव काळोखे (वय ५२) याच्याकडून ११२ किलो २९ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) चा अंमली पदार्थांचा साठा सातारा पोलिसांनी हस्तगत केला होता. तर काळोखे हा कार्यरत असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या त्याच्या कपाटातून १२ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी अंंमली पदार्थ तस्करीप्रकरणी धर्मराज काळोखेसह या अंमली पदार्थाची मुंबईतील तस्कर क्वीन बेबी पाटणकरसह पुरवठा केलेल्या ग्यान मनिक्कम सॅम्युअल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेबी पाटणकर ही अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र, पोलिसांच्या ताब्यात बेबी पाटणकर मोठ्या शिताफीने सापडली. दरम्यान, याप्रकरणी महत्त्वाचा दुवा असणारा सॅम्युअल हा खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असल्याने अनेक खुलासे होण्याची शक्यता असून, महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करीत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी तपासाची गती वाढविली असून, सॅम्युअलला घेऊन अधिक तपासाकरिता पुणे येथे घेऊन गेले आहेत. दरम्यान, सॅम्युअल हा इतर राज्यांतून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)