केवळ भांडवलदारांसाठीच सध्याचे सरकार कार्यरत
By Admin | Updated: August 3, 2014 22:44 IST2014-08-03T21:33:44+5:302014-08-03T22:44:35+5:30
गोविंद पानसरे : वाळव्यात क्रांतिसिंहांना अभिवादन

केवळ भांडवलदारांसाठीच सध्याचे सरकार कार्यरत
वाळवा : महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. सध्या केवळ भांडवलदारांसाठी सरकार चालविले जात आहे की काय?, असा प्रश्न पडतो. गोरगरिबांचे राज्य येण्यासाठी आज प्रतीक्षा करुया व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करुया, हीच त्यांना जयंतीदिनी खरी श्रद्धांजली ठरेल.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने वाळव्यातील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ११४ व्या जयंती कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी पानसरे बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष जयवंत अहिर, महादेव कांबळे, डॉ. सुषमा नायकवडी प्रमुख उपस्थित होते. पानसरे म्हणाले, क्रांतिसिंहांच्या विचाराने आताच्या राज्यकर्त्यांनी शासन चालवायला हवे. हे शासन फक्त भांडवलदारांसाठीच असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला आहे. सामान्यांबद्दल त्यांना आस्था नाही.वैभव नायकवडी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल, अपेष्टा सहन केल्या. तुरुंगवास भोगला; मात्र त्यांना स्वातंत्र्यानंतरच्या सत्तेत वाव मिळाला नाही. याउलट काही महाभागांनी त्यांची ‘दरोडेखोर’ म्हणून हेटाळणीसुद्धा केली आहे, हे दुर्दैव आहे. सुषमा नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी यांनी केले. सौ. एस. व्ही. कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)