संचारबंदीचा विवाह सोहळ्यांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:19+5:302021-04-20T04:39:19+5:30
वरकुटे-मलवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत राज्यव्यापी संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा विवाह ...

संचारबंदीचा विवाह सोहळ्यांनाही फटका
वरकुटे-मलवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत राज्यव्यापी संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा विवाह सोहळ्यांनाही फटका बसला आहे. अनेकांनी धूमधडाक्यात साखरपुडे साजरे केले. त्यानंतर लग्नसोहळ्याचे वेध लागले. मात्र, संचारबंदी लागू झाली अन् वधू-वर पक्षांसह सर्वांचा हिरमोड झाला.
कोरोनाचा कहर कधी थांबेल, याचा भरवसा नसल्यामुळे १ मेनंतर शासकीय नियम पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कर्तव्य उरकण्याचे विचार वधू-वरांकडील पालक मंडळी करताहेत. यामध्ये लॉकडाऊनमुळे लग्नसोहळ्यामधील अनावश्यक खर्च वाचत असल्याचा काहींचा आनंद असला, तरी काही धनदांडग्या लोकांना मात्र लॉकडाऊनमुळे शाही विवाह सोहळ्यातील डामडौल करता येणार नाही, याचे दु:ख सलत आहे.
‘आलीया भोगाशी’ म्हणत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडावे लागणार आहेत. एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३० तर मे महिन्यात : १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ अशा तारखा आहेत, परंतु या तारखा सारख्या पुढे ढकलल्या जात आहेत, तर काही जण परिस्थितीनुसार समारंभ उरकण्याच्या तयारीला लागले आहेत.
(चौकट)
पुरक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका
कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वत्र भीतीचे सावट आहे. अनेक नातेवाईक आमंत्रण देऊनही लग्नसोहळ्यांना उपस्थित राहतील की नाही, याची शाश्वती धरता येत नाही, तसेच लग्न सोहळ्यावर अवलंबून असलेली मंगलकार्यालये, केटरिंग, भांडी, कपडे, वाजंत्री, मंडप व्यावसायिक, फेटे व्यावसायिक, स्वयंपाक करणाऱ्या महिला, आचारी, छायाचित्रकार, घोडेवाले, बॅँजो या अशा एक ना अनेक पूरक उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे.