जिमला निघालेल्या युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 14:58 IST2017-09-27T14:57:55+5:302017-09-27T14:58:00+5:30
घरातून जिमला जात असताना सात ते आठ जणांनी वाटेत अडवून सोनल संजय अहिवळे (वय २९, रा. जाधववाडी ता. फलटण) या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

जिमला निघालेल्या युवकाचा निर्घृण खून
फलटण, दि. 27 : घरातून जिमला जात असताना सात ते आठ जणांनी वाटेत अडवून सोनल संजय अहिवळे (वय २९, रा. जाधववाडी ता. फलटण) या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
सोनल अहिवळे याच्या घरापासून चार किलोमीटर अंतरावर जिम आहे. तो रोज सकाळी साडेसहा वाजता जिमला जात होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो दुचाकीवरून जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या सात ते आठ युवकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढविला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्या अंगावर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लोखोरांनी तेथून पलायन केले.
दरम्यान, सकाळी सातच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर आलेल्या नागरिकांना सोनल अहिवळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर काही लोकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अहिवळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. सोनलवर कोणत्या कारणासाठी व कोणी हल्ला केला, हे अद्याप समोर आले नाही. ग्रामस्थ व नातेवाइकांनी हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला आहे.