पराभव दिसू लागल्याने असंस्कृत प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 23:36 IST2016-04-15T21:38:34+5:302016-04-15T23:36:03+5:30
मकरंद पाटील : प्रचारात मुद्दा नसल्याने विरोधकांचे खोटे आरोप राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपरा जयकुमार गोरे : लोणंद नगरपंचायत करण्यामागे विकासकामांचा ओघ हाच उद्देश

पराभव दिसू लागल्याने असंस्कृत प्रचार
लोणंद : राष्ट्रवादी काँग्रेसला लोणंदच्या विकासकामांची दूरदृष्टी आहे. लोणंद नगरपंचायतीला विकासकामाचे रोल मॉडेल बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तीन वर्षांतील कामांचा ओघ पाहून जनतेने राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांना या निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने असंस्कृत प्रचाराचे बीज पेरले जात आहे. राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी उभारलेले विरोधकांचे षड्यंत्र जनताच उधळून लावेल. धास्तावलेल्या विरोधकांना प्रचारात मुद्दा नसल्याने फक्त खोटे आरोप करण्यात ते गुंतलेले आहे,’ अशी टीका आमदार मकरंद पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, सभापती नितीन भरगुडे-पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, अनिता शेळके, मनोज पवार, एन. डी. क्षीरसागर, विठ्ठल शेळके, हणमंत शेळके, योगेश क्षीरसागर, भरत शेळके, मेघा शेळके, गीतांजली क्षीरसागर, दीपाली क्षीरसागर, सुनंदा पानवकर, मंगल कांबळे, भिकुदादा कुरणे आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘तीनच वर्षांत लोणंदचे रूप पालटवून विकासकामे मार्गी लागल्याने विरोधकांच्या डोळ्यात हा विकास टोचत आहे. म्हणूनच खोट्या आरोपांनी वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न केला जातोय; पण लोणंदची जनता सुज्ञ आहे. कोणीही कितीही गप्पा मारल्या तरी विकास हा स्थानिक आमदार म्हणून मीच करणार आहे. विरोधकांच्या बेताल वक्तव्याचा समाचार जनता मतदानातूनच देईल.’
आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘लोणंदमध्ये मी स्वत: लक्ष घालून जिल्हा परिषद आमदार फंडातून कोट्यवधीची कामे केली. १५ वर्षांत काँग्रेसने लोकांना झुलवत ठेवले. त्यामुळेच गतवेळी बदल झाला. तीन वर्षांत झपाट्याने झालेला विकास हे आमदार मकरंद पाटील यांच्या कामाचे प्रतीक आहे. त्यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. खोटे बोलण्यात ख्याती असलेल्या काँग्रेसच्या नादाला जनतेने लागू नये.’ (वार्ताहर)
निवडणूक संपल्या की गायब, असे काँग्रेस नेत्यांसारखा मी नाही
नगरपंचायत निवडणूक लागल्यापासून विरोधक माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. वास्तविक या मतदारसंघाचा आमदार म्हणून इथल्या जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या दारात गेलो म्हणजे चूक ठरत नाही. उलट विरोधकांच्या विचारांची कीव करावीशी वाटते. माझा वर्षभर लोकांचा सातत्याने संपर्क असतो. निवडणूक संपल्या की गायब होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांसारखी माझी सवय नाही, असे परखड मत आमदार मकरंद पाटील यांनी मांडले.
नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘लोणंदच्या जनतेने आमदारांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. मतदारसंघातील तीन नगरपालिकेच्या कारभाराचा अनुभव असल्याने आमदार मकरंद पाटील लोणंदमध्ये विकासात्मक बदल घडवतील. राज्यातील मंत्र्यांची आणि बाहेरच्या आमदारांची फौज प्रचारात उतरली असली तरी त्यासाठी स्थानिक आमदार सक्षम आहेत. दुसऱ्याच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. राष्ट्रवादी आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.’
राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपरा
जयकुमार गोरे : लोणंद नगरपंचायत करण्यामागे विकासकामांचा ओघ हाच उद्देश
लोणंद : ‘लोणंद नगरपंचायत होण्यापाठीमागे केवळ काँग्रेसचेच योगदान आहे. विकासकामांचा ओघ वाढावा, यासाठीच हा निर्णय होता. मात्र, विरोधकांनी यात खोडा घातला. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत आमदारांच्या घरातीलच दोन संचालक आहेत. सत्तेतून पैसा मिळवून शेतकऱ्यांचे शोषण केले. राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची परंपरा आहे. राष्ट्रवादीने जिल्हा बँक मोडून खाल्ली,’ असा घणाघात माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.
लोणंद नगरपंचायतीचा काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रचार प्रमुख अॅड. बाळासाहेब बागवान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, रणजितसिंह निंबाळकर, सचिन फरांदे, किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष गुरुदेव बरदाडे, किरण बर्गे, मस्कुअण्णा शेळके, प्रीती नागर, सुभाष घाडगे, उमेश खरात, राजेंद्र डोईफाडे, बाळू शेळके, हेमलता कर्णवर, स्वाती भंडलकर, हेमंत खरात, शैला खरात आदी उपस्थित होते.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. पीक कर्जाचे वाटप, पीक पाहणी केल्यावरच द्या, हे न्यायाचे नाही. पिकं बघायला आल्यावर त्यांना दांडके काढून बसा. विकासाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या कोट्यवधींची विकासकामे आम्ही करून दाखवू,’ असे अश्वासनही त्यांनी दिले. अॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘लोणंदची सत्ता राष्ट्रवादीकडे विकासाचे वाटोळे झाले आहे.
ज्या लोकांची नीतिमत्ता पाहून आम्ही बाजूला सारले त्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काय विकास साधणार आहे. आणि अशा भ्रष्ट स्थानिक नेत्यांसाठी आमदार गल्ली बोळात फिरत आहेत.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘बाळासाहेब बागवानांना लोणंदच्या विकासाची जाण आहे. बाहेरून येऊन पोकळ काळजी दाखविणाऱ्यांचे हे काम नाही. फलटणच्या राजे मंडळींनी औद्योगिक वसाहतीत स्वत:चे ठेकेदार नेमलेत. आणि वाड्यावर येऊन ते हप्ता पोहोच करतात. हप्तेगिरी करणारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लोणंदपासून दूरच ठेवा.’ (वार्ताहर)
दम असेल तर बारामतीला जाणारे पाणी थांबवून दाखवा..
लोणंदची निवडणूक एकाच नावाभोवती फिरतेय, ती म्हणजे बाळासाहेब बागवान. कारण, त्यांना थोपविण्यासाठी एका आमदाराला अधिवेशन सोडून लोणंदमध्ये तळ ठोकावा लागतो. बदलत्या आणि बहरत्या लोणंदचे स्वप्न दाखविणारी राष्ट्रवादी पार्टी ही नॅशनल करप्ट पार्टी आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. काँग्रेसने लोणंदमध्ये पिण्याच्या पाण्याची आखलेली योजना राष्ट्रवादीने मोडीत काढली. भूमिपूजनाच्या कोनशिलाही ठेवल्या नाहीत. लोणंदला पाण्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी बारामतीला जाणारे पाणी थांबवून दाखवावे. आम्हाला वाई-फलटणचे वारे अजून लागले नाही. लोणंदकरांनी ती हवा डोक्यात घेऊ नये, असे आमदार जयकुमार गोरे म्हणाले.
ज्या आमदारांना लोणंद शहर नीट माहीत नाही, ते विकास काय करणार आहेत. नगरपंचायतीची पहिली अधिसूचना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढली. ती बेकायदेशीर म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची विचारांची दिवाळखोरी समोर आली आहे, अशी घणाघाती टिका अॅड. बाळासाहेब बागवान यांनी केली.