सांगली : महापालिकेच्या घरकुल योजनेकडील एक कोटी रुपयांचा शासकीय निधी इतरत्र वळवून प्रशासनाने अफरातफर केली आहे. आता ही अपहार झाकण्यासाठी अंदाजपत्रकातील इतर हेडखालील रक्कम प्रकल्पाकडे वळविल्याचा आरोप माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, घरकुल योजनेवर शासन निधीतील ३१ कोटी व महापालिकेकडून ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या या योजनेकडे एक पैसाही शिल्लक नाही. त्यातच घरकुल योजनेतील एक कोटी रुपये विद्युत विभागाच्या कामाचे बिल भागविण्यासाठी ठेकेदाराला दिले गेले. हा शासकीय निधी इतर कोठेही वापरता येत नाही. प्रशासनाने ही चूक करून या रकमेचा अपहारच केला आहे. घरकुल योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनीही शासनप्राप्त निधी मंजूर योजनेवर खर्च होणे अपेक्षित असल्याची कबुली दिली आहे. विद्युत विभागाकडील शिल्लक निधीचा आढावा घेता, यंदाच्या अंदाजपत्रकात ६ कोटीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी पथदिवे विद्युत आकारापोटी ५ कोटी २९ लाख रुपये खर्च झाले आहेत. केवळ ७१ लाख रुपये शिल्लक आहेत, तर देखभाल-दुरुस्तीकडे १९ लाख शिल्लक आहेत. या दोन्ही लेखाशीर्षाखाली काही रक्कम वर्ग करून प्रशासनाने ९९ लाख ८२ हजार रुपये घरकुलांकडे वर्ग केले. ही बाब अत्यंत चुकीची आहे. घरकुल व विद्युत विभाग हे दोन्ही लेखाशीर्ष वेगवेगळे आहेत. त्यातील रक्कम तबदिल करता येत नाही. याबाबत शनिवारी होणाऱ्या महासभेत जाब विचारणार आहोत. (प्रतिनिधी)
घरकुल योजनेत एक कोटीची अफरातफर
By admin | Updated: December 19, 2015 00:42 IST