शासकीय योजनांसाठी पीक नोंदणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:04+5:302021-09-12T04:45:04+5:30
रहिमतपूर : ‘ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे शासकीय मदत, ...

शासकीय योजनांसाठी पीक नोंदणी अनिवार्य
रहिमतपूर : ‘ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे शासकीय मदत, विमा, पीककर्ज अनुदानाचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतील. शेतकऱ्यांनी स्वत: बांधावर जाऊन पिकाची नोंद करून शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे’, असे आवाहन कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद करण्याबाबतचे मार्गदर्शन ज्योती पाटील यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार अमोल कदम, मंडल अधिकारी विनोद सावंत, तलाठी पृथ्वीराज पाटील, कोतवाल पोपट बोराटे, अनिल माने, अभय माने, वैभव शेरकर यावेळी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेनऊ वाजताच रहिमतपूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई - पीक पाणी ॲपद्वारे पिकाची नोंदणी किती गरजेची आहे, त्याचा फायदा काय अन् नोंदणी न केल्यास त्याचा होणारा तोटा याबाबतची माहिती दिली. ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे, पिकाची नोंदणी कशी करावी, फोटो कसा डाऊनलोड करावा याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित शेतकऱ्यांकडून पिकाची नोंदणी करून घेतली. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर मंडल व वाठार मंडलामधील प्रत्येक गावात ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करण्यासाठी शिबिरांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे करावी, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले.
फोटो :
रहिमतपूर येथे शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीबाबतचे मार्गदर्शन ज्योती पाटील यांनी केले. (छाया : जयदीप जाधव)