सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागील पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. फेब्रुवारीपासून दुसरा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात वादळ, वळवाचा पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील नजर अंदाजे ३२६ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या एक हजारांवर आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती नाही. वरुणराजाने भरभरून जिल्ह्यावर वर्षाव केला आहे. २०१९ मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, तर २०२० मध्येही ऑगस्ट महिन्यापासून धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे मागीलवर्षीही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. त्यातच दुष्काळी तालुक्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी अडले व जिरले. त्यामुळे दुष्काळाची स्थिती राहिली नाही. पण, जिल्ह्यात दुष्काळ नसलातरी पावसाने नुकसान होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. मात्र, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आणि फळबागांचे नुकसान झालेले. यामधून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचा दणका बसला. खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले, तर आता गेल्या आठवड्यात वादळासह वळवाचा पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये खटाव आणि कोरेगाव या दोन तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. पावसापेक्षा गारपीटच धोकादायक ठरली. मोठमोठ्या गारा पडल्या. त्यामुळे फळबागांना मोठा दणका बसला.
गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील आणि खटावच्या मोळ, डिस्कळ भागात काश्मीरचे रूप आले होते. शेत शिवारात सर्वत्र गारांचा खच होता. त्यामुळे टमाटा, चिकू, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा ऐवढा मारा होता की कलिंगडला पाला राहिला नाही. तसेच आंब्याचेही नुकसान झाले. रानातील कांदाही नासू लागलाय. भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी उभा राहत असताना वळवाचा पाऊस आणि गारपिटीने दुसरा दणका दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
गेल्या आठवड्यातील पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच आकडेवारी समोर येईल. पण, आधार मिळण्याठी नुकसानभरपाई लवकर मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.
चौकट :
पाऊस, गारपिटीतील नुकसानीची
नजरअंदाजे आकडेवारी
तालुका पिके बाधित क्षेत्र शेतकरी संख्या
(हेक्टरमध्ये)
कोरेगाव वांगी, टमाटा, कांदा, ८७ २९१
भाजीपाला, मका, झेंडू
अन् पपई.
खटाव आंबा, चिकू, हरभरा, घेवडा, २३७ ७२९
भाजीपाला, कांदा, मिरची,
टमाटा, मका, भुईमूग, बाजारी
व कलिंगड.
पाटण आंबा, मिरची, दुधी भोपळा. ०.२६ १
माण टमाटा अन् आंबा. २.१० ८
एकूण क्षेत्र ३२६.३६ हेक्टर. बाधित शेतकरी संख्या १०२९
.............................................................................
एखादा नुकसानीचा फोटो वापरावा...
....................................................................