कोरोनात नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:51+5:302021-02-26T04:54:51+5:30

दहिवडी : ‘दहिवडीतील नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी काळजी घ्यावी; मात्र नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, वेळप्रसंगी ...

Criminal charges against coroners | कोरोनात नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

कोरोनात नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

दहिवडी : ‘दहिवडीतील नागरिकांनी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी काळजी घ्यावी; मात्र नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करावेत,’ असा गर्भीत इशाराच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.

दहिवडी येथील कॉलेज येथील सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी शहरातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्धन कासार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, माणच्या तहसीलदार बाई माने, खटावचे तहसीलदार किरण जमदाडे, दोन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘कोरोनाशी कसा लढा द्यायचा हे आपण शिकलो आहोत. मात्र, काही महिन्यांत काही लोकांनी थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. यात सर्वांना दोष देता येणार नाही. मास्क योग्य पद्धतीने वापरा, संरक्षित अंतर ठेवा व हात स्वच्छ धुवा. दहिवडीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आपण शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यामागील भावना लोकांनी समजून घ्यावी. सारी, कोरोनाचा प्रसार इतरत्र होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेत आहोत.

कोणत्याही कारणासाठी कोणीही प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जाऊ नये. कंटेन्टमेंट झोनमधील सर्व शासकीय, खासगी आस्थापना बंद राहतील. शासकीय कार्यालयात फक्त अंतर्गत कामकाज सुरू राहील. बाहेरील कोणीही तिथे येणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालय मालकांवर पहिल्यावेळी पंचवीस हजार रुपये, तर दुसऱ्या वेळी एक लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. लग्न मालकाला दहा हजार रुपये, तसेच लग्नात मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड, तसेच फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहिवडी प्रतिबंधात्मक क्षेत्र असणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळा-महाविद्यालये, तसेच कॉलेज बंद करण्यास सांगितले आहे. स्थानिक अस्थापनाही बंद करण्यास सांगितले आहे. वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण दहिवडी शहराची खबरदारी घेत संपर्कात आलेल्यांनी तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

चौकट

दहिवडीतील स्थानिक आस्थापना, शाळा-महाविद्यालय प्रतिबंधात्मक क्षेत्रात बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी आदेश देऊनही दोन दिवस सुरू होते. मात्र, याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने यासंबंधीचे आदेश नक्की शाळा-महाविद्यालयांना, तसेच स्थानिक आस्थापनाला होते की सर्वसामान्य नागरिक, गवंडी, कामगार यांना होते असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत,’ अशी मागणी ग्राहक प्रबोधन समितीचे माण येथील राजू मुळीक यांनी केली.

चौकट

शहरातील आणखी दहाजण बाधित

दरम्यान, गुरुवारी आलेल्या अहवालानुसार दहिवडी शहरातील दहाजणांचे अहवाल बाधित आले आहेत. दहिवडीची संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

फोटो २५दहिवडी

दहिवडी महाविद्यालयात गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, विनय गौडा उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)

Web Title: Criminal charges against coroners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.