कऱ्हाडच्या प्रांतांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 12, 2016 00:36 IST2016-06-12T00:36:27+5:302016-06-12T00:36:27+5:30
मारहाणप्रकरण : ट्रक चालकाची तळबीड पोलिसांत फिर्याद

कऱ्हाडच्या प्रांतांवर गुन्हा दाखल
कऱ्हाड : वडोली-भिकेश्वर, ता. कऱ्हाड येथील वाळू ठेक्यावरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, चालकाने याबाबत तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सचिन काशीनाथ पवार (वय ३६, रा. रत्नदीप बंगला, गजानन हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सचिन यांना त्यांचा मित्र शरद जाधव याचा फोन आला. वडोली-भिकेश्वर येथे वाळूच्या अवटीवर ट्रक बंद पडल्याचे सांगून मिस्त्रीला त्याठिकाणी घेऊन ये, असे त्याने सचिन यांना सांगितले. मात्र, त्यावेळी सचिन हे त्यांच्या ट्रकच्या पासिंगचे पैसे भरण्यासाठी विजयनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. तेथील काम संपल्यानंतर वारुंजी फाटा येथून मिस्त्रीला घेऊन सचिन पवार हे तासवडे टोलनाकामार्गे कारने वडोली-भिकेश्वरमध्ये गेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी वाळूचे काही ट्रक अडविल्याचे त्यांना दिसले. नादुरुस्त ट्रकजवळ गेल्यानंतर मिस्त्रीने संबंधित ट्रक दुरुस्त केला. काम सुरू असतानाच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक प्रांताधिकाऱ्यांची जीप त्याठिकाणी आली. जीपमधून प्रांताधिकारी किशोर पवार खाली उतरले. ‘येथे का थांबला आहेस,’ अशी विचारणा त्यांनी सचिन पवार यांना केली. ट्रक दुरुस्त करीत असल्याचे सचिन यांनी सांगितले. मात्र, प्रांताधिकाऱ्यांनी काहीही न ऐकता त्यांच्या जवळील लाकडी दांडक्याने सचिन पवार यांना मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सचिन पवार यांच्याबरोबरच ट्रक दुरुस्तीसाठी आलेला मिस्त्री व अन्य एकालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याबाबत सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रांताधिकारी किशोर पवार यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल
या मारहाणीत जखमी झालेल्या सचिन पवार यांच्यावर उंब्रज येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात
आले आहे. (प्रतिनिधी)