‘त्या’ तरुणीवरच धमकी दिल्याचा गुन्हा
By Admin | Updated: November 6, 2015 23:38 IST2015-11-06T23:28:03+5:302015-11-06T23:38:26+5:30
पैसे घेतलेच नाहीत : इस्टेटीसाठी कुभांडचा दावा

‘त्या’ तरुणीवरच धमकी दिल्याचा गुन्हा
सातारा : आपण विवाहित असल्याचे सांगूनही गुजरातमधील तरुणीने आत्महत्येची धमकी देऊन लग्न करण्यास भाग पाडले, असा दावा कोरेगाव तालुक्यातील विक्रम हणमंत किंजले याने केला आहे. वडिलांची इस्टेट मिळविण्यासाठी तिने कुभांड रचल्याचा त्याचा दावा असून, तिला पहिल्या पतीकडून घटस्फोट मिळालेला नसताना तिने दुसरे लग्न केले. आपण तिचे पैसे लुबाडल्याचे तिने सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्याने दिले असून, ती वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याबद्दल त्याने रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.
आपल्याशी लग्न करून किंजले याने आपल्या खात्यातून १८ लाख रुपये काढून पोबारा केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला होता. आपल्याकडून एकंदर २५ लाख रुपये घेतल्याचाही तिचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर, या घटनेची दुसरी बाजू समोर आणताना विक्रम किंजले याने सांगितले की, ‘पाच मे रोजी माझे लग्न माण तालुक्यातील मुलीशी झाले आहे. तत्पूर्वी मी गुजरातमध्ये नोकरीस होतो. माझ्या हाताखाली संबंधित तरुणी नोकरीला होती. ओळख वाढल्यानंतर मी माझी काही रक्कम तिच्याकडे विश्वासाने ठेवायला दिली होती.
माझे लग्न झाल्यावर मी पुन्हा गुजरातमध्ये गेलो असता, आपल्या वडिलांची इस्टेट आपल्याला मिळणार असून, त्यासाठी मी विवाहित असणे आवश्यक आहे, असे सांगून संबंधित तरुणीने लग्नाची गळ घातली. तिचा पहिला विवाह झाला असून, तिला एक मुलगाही आहे. ती पहिल्या पतीबरोबर राहत नाही. लग्न करणे शक्य नसल्याचे मी सांगताच तिने आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने लग्न करायला लावले. मी माझीच रक्कम घेऊन गावी आलो असून, तिच्याकडून कोणतीही रक्कम लुबाडलेली नाही.’
त्यानंतरही संबंधित तरुणी वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत असून, आपण तिच्याबरोबर गुजरातमध्येच राहायला हवे, अशी गळ घालत असल्याचे किंजले याने सांगितले. ‘आम्ही कोणीही तिला कधीच धमकी दिली नाही; उलट तिला भेटायला गुजरातला गेलो असता विषारी औषध स्वत:च्या मानेवर फवारून सर्वांसमक्ष ती खाली कोसळली. तिला आम्हीच रुग्णालयात दाखल केले होते. ती आमच्या गावी येऊन वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने दि. १२ सप्टेंबर आणि २८ आॅक्टोबर रोजी तिच्याविरुद्ध आम्ही रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे,’ असे त्याने नमूद केले. विशेष म्हणजे त्याचे वय २७ असून, ती ४० वर्षांची आहे. (प्रतिनिधी)