शिवसेनेच्या संदीप सुतारवर गुन्हा
By Admin | Updated: September 18, 2014 23:29 IST2014-09-18T22:48:17+5:302014-09-18T23:29:20+5:30
पोलिसांची नोटीस : पत्रकार अविनाश कोळींना जिवे मारण्याची धमकी

शिवसेनेच्या संदीप सुतारवर गुन्हा
सांगली : ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांना शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोळी यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार सुतारविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुतारने जिल्हाप्रमुख पदावर असताना शुभेच्छाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीपोटी त्याने ३५ हजारांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश वठला नाही. त्यामुळे पुन्हा त्याने नव्याने धनादेश दिला. पण तोही वठला नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने त्याच्याविरुद्ध सांगलीच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतारची जिल्हा प्रमुखपदावरुन उचलबांगडी केली आहे. गेल्या आठवड्यात (१२ सप्टेंबर) कोळी यांना सुतारने मोबाईलवर संपर्क साधून, ‘तुझ्यामुळे माझे जिल्हा प्रमुखपद गेले आहे, तुला जिवंत ठेवणार नाही. तुला संपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करणारा एसएमएसही पाठविला होता. या प्रकारानंतर कोळी यांनी पोलीसप्रमुख सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांना, चौकशी करुन तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुतारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
सुतारला नोटीस
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पोलिसांनी सुतारवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याला ७२ तासात पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आज (गुरुवार) या गुन्ह्याचा कसून तपास केला. कोळी यांना मोबाईलवर केलेले कॉल व शिवीगाळ करणाऱ्या पाठविलेल्या एसएमएसची प्रिंट ताब्यात घेतली.