नवरदेवासह डीजेमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST2021-03-08T04:37:17+5:302021-03-08T04:37:17+5:30
शिरवळ : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचा भंग करीत पळशी येथे लग्नाच्या देवदर्शनाची विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी ...

नवरदेवासह डीजेमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
शिरवळ : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचा भंग करीत पळशी येथे लग्नाच्या देवदर्शनाची विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी नवरदेवासह ध्वनिक्षेपक यंत्रणा मालकाविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लाखोंचे ध्वनिक्षेपक यंत्रणा असलेले वाहन जप्त केले आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पळशी येथे विनापरवानगी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून नागरिकांना एकत्रिक केल्याचा निनावी फोन शिरवळ पोलीस स्टेशनला आला होता. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस हवालदार शिवराज जाधव यांनी पळशी येथे जाऊन खात्री केली. पळशी येथील नवरदेव सागर धनाजी भरगुडे याने लग्नाच्या देवदर्शनाकरिता नागरिक जमा करून ओंकार धनंजय पवार (२५, रा. वडगाव पोतनीस, ता. खंडाळा) याने वाहन (एमएच १२ जेके ०७४०) मध्ये ध्वनिक्षेपक लावत कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावत नागरिकांना एकत्रित केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी लाखो रुपयांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या वाहनासह साहित्य जप्त केले.
नवरदेव सागर भरगुडे, ध्वनिक्षेपक यंत्रणा मालक ओंकार पवार यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शिवराज जाधव यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करीत आहेत.