शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST2021-07-07T04:48:29+5:302021-07-07T04:48:29+5:30

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, सागर आमले, ...

Crime filed against 80 holders including Sambhaji Bhide of Shiv Pratishthan | शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल

शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंसह ८० धारकऱ्यांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह अन्य धारकऱ्यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीवर राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडी सोहळा काढण्यास मनाई करण्यात आली असून वारीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. शासनाने बंडातात्या कऱ्हाडकर यांच्यासह वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी द्यावी, या मागणीला समर्थन देत सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे कऱ्हाडातील दत्त चौकात आले. त्यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ७० ते ८० धारकऱ्यांनी बंद असलेले साईबाबा मंदिर उघडून आत बसले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत परवागनी न घेता जमाव जमवून रॅली काढली. यावेळी रॅलीत सहभागी धारकऱ्यांनी विनामास्क शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा भगवा झेंडा हातात घेऊन दत्त चौक ते प्रशासकीय इमारत येथे घोषणाबाजी करत पायी चालत जात तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime filed against 80 holders including Sambhaji Bhide of Shiv Pratishthan